बुलडाणा : अस्वलाने अचानक हल्ला केल्यामुळे ३५ वर्षीय मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास तालुक्यातील नांद्राकोळी गावालगतच्या परिसरात घडली. जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन अकोला हलविण्यात आले आहे. नांद्राकोळी गावालगतच्या परिसरात साधारण २५ ते ३० घरांची रोशनी नगर वस्ती आहे. येथील नजीर शाह यासिन शाह मजूरीचे कामे करुन कुटूंबाचा प्रपंच चालवितात. सकाळी कामानिमित्त ते गावाकडे जात होते. अचानक अस्वलाने त्यांच्यावर हल्ला चढविला. अस्वलाच्या तावडीतून सुटका करण्यासाठी त्यांनी प्रतिकार केला. त्यांची आरडोओरड ऐकल्यामुळे परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आले. त्यांनी अस्वलाला हुसकावून लावले. तसेच जखमीस तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना अकोला हलविण्यात आले आहे. अस्वलाच्या हल्ल्यात नजीर शाह यासिन शाह यांच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान वनविभागाच्या वतीने जखमीस तातडीची पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. रोशनी नगर हा गावाला लागून असलेला परिसर आहे. आजूबाजूला शेती व जंगल आहे. शुक्रवारी सकाळच्या वेळी अस्वलाने नजीर शाह यासिन शाह यांच्यावर हल्ला चढविला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल
हल्ला केल्यानंतर अस्वल गावालगतच्या मकाच्या शेतात लपून बसले आहे. याबाबत माहिती मिळताच वनविभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहचली असून रेस्क्यू आॅपरेशन सुुरु करण्यात आले आहे. परिसरातील नागरिकांनी शेतात जातांना सतर्कता बाळगावी, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.