लाेणार : जागतिक पर्यटनस्थळ लोणार सरोवर पाहण्यासाठी येणारे बहुतांश पर्यटक एसटी बसचा वापर करतात. तसेच तालुक्यातील गाव-खेड्यांची नाळ एसटी बसमुळे शहराशी जोडलेली आहे. यामुळे लोणार बसस्थानक नेहमी गजबजलेले असते. सतत प्रवाशांची वर्दळ असलेल्या लोणार बसस्थानकावर मात्र, बसस्थानक प्रमुख व वाहतूक नियंत्रक नसल्याने प्रवाशांना गैरसोयीचा अनुभव येत असल्याचे चित्र आहे.
बसस्थानक परिसरामध्ये स्वच्छतेचा अभाव असून, प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही. तसेच शौचालयामध्ये स्वच्छतेचा अभाव दिसून येतो. बसस्थानक परिसरामध्ये बेशिस्त नागरिकांचा वावर दिसून येतो. शिवाय प्रवाशांना माहिती उपलब्ध होत नसल्याने त्यांची गैरसोय होत असल्याने ते खासगी वाहतुकीकडे वळत असल्याचे एकंदरीत परिस्थिती आहे. बसस्थानक प्रमुख असल्यास काही प्रमाणात का होईना पण, प्रश्न निकाली निघू शकतात. मात्र, तरीही याकडे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने जागतिक पर्यटनस्थळ लोणार सरोवर बसस्थानक भकास होत असल्याचे चित्र आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि पर्यटन नगरीच्या दृष्टीने विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी वाढत आहे.
मेहकर डेपो व्यवस्थापक रणवीर कोळपे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. मेहकर सहायक वाहतूक अधीक्षक हरीश नागरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, लोणार येथील वाहतूक नियंत्रक सेवानिवृत्त झाल्यावर तेथे कोणी नेमलेले नाही. अधिक माहितीसाठी बुलडाणा विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा
एसटी महामंडळाला आर्थिक फटका
वाहतूक नियंत्रक नसल्याने ग्रामीण भागातील गाड्यांचे नियोजन कोण करत असेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नियोजन होत नसेल तर एसटी बस तोट्यात जाऊन प्रवाशांना खासगी वाहनांमधून प्रवास करून आर्थिक नुकसान सोसण्याची शक्यता नाकारता येत नाही.