लोकमत न्यूज नेटवर्क लोणार : शाळेचे गळके छत, तुटलेल्या भिंती, संरक्षक भिंतीचा अभाव, आजूबाजूला अस्वच्छता ही अवस्था लोणार तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांची झालेली आहे. अनेक शाळांचे छतही गळके असल्याने पावसाळ्याच्या दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना वर्गात बसणे अवघड होते. त्यात जि.प. शाळांची दुरवस्था, यामुळे जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानच होत आहे.तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ८९ शाळा आहेत. त्यापैकी अनेक शाळांची अवस्था अतिशय वाईट आहे. अनेक शाळांची दुरवस्था झालेली आहे. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या संरक्षक भिंतींची अनेक वर्षांपासून चाळण झाली असताना प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शाळा परिसरात मोकाट जनावरांचा वावर वाढतो. कुंपण नसलेल्या शाळा तर मद्यपी व जुगार पत्त्यांचा अड्डाच बनली आहेत. शाळेच्या आवारात तर मोठ्या प्रमाणात डुकरे, कुत्रे फिरताना चित्र पहावयास मिळत आहे. याकडे शाळा व्यवस्थापन समितीचेही दुर्लक्ष होत आहे. अनेक शाळांना कुंपण नसल्याने शाळा बंद झाल्यावर या शाळा मद्यपींचा अड्डा बनत आहेत. जिल्हा परिषदेच्या काही शाळा गुणवत्तेच्या निकषावर पुढे येत आहेत, तर काही शाळा ई-लर्निंग आणि डिजिटल व स्पर्धात्मक शाळा होत असताना तालुक्यातील जि.प. शाळांच्या या दुरवस्थेची जबाबदारी कोणाची? हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. लोणार तालुक्यात पावसाचे प्रमाण सध्या कमी आहे. शाळा व्यवस्थित सुरू होणे आणि पावसाळा येणे एकाच वेळी सुरू होईल; परंतु अजूनही दुरवस्था झालेल्या जि.प.शाळांच्या दुरुस्तीची हालचाल नसल्याने येणारा पाऊस अंगावर झेलत या शाळेतून ज्ञानार्जन करावे लागणार आहे. दरवर्षी घटते विद्यार्थी संख्या८९ जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आकडेवारीवरून पहिलीच्या एका वर्गात एकूण केवळ १७१६ विद्यार्थी संख्या आहे. म्हणजे सरासरी एका वर्गात २० विद्यार्थी आहेत. हीच आकडेवारी वरच्या वर्गाकडे कमी-कमी होत असताना दिसून येते. याच्या उलट खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांचा आलेख वाढता आहे. जिल्हा परिषद शाळा वाचविण्यासाठी शिक्षण विभागाने विचार करून निर्णय घेण्याची वेळ आलेली असून, तसे न झाल्यास शिक्षण क्षेत्रात संपूर्ण खासगीकरण होण्यास वेळ लागणार नाही.
जिल्हा परिषद शाळांना संरक्षण भिंतीचा अभाव
By admin | Published: July 14, 2017 12:42 AM