लोणार : शहरातील नालेसफाई वेळेवर होत नसल्याने सांडपाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नालेसफाई पूर्ण झाल्याचे कागदोपत्री घोषित करण्यात आले आहे. परंतु, प्रत्यक्षात नालेसफाई हा केवळ देखावाच ठरत आहे. शहरातील अनेक भागातील नाले अद्यापही गाळामध्ये आहेत. शेगाव-पंढरपूर मार्गाचे काम सुरु असल्याने यावर्षी यंत्राच्या सहाय्यानेही गाळ साफ करण्याचे प्रयोग हाती घेण्यात आले होते. मात्र, या नालेसफाईचा पुन्हा आढावा घेतल्यानंतर मुख्य नाल्यामधील कचऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. शहराचा काही भाग वगळता इतर ठिकाणी नालेसफाई कमी प्रमाणात झाल्याचे दिसून येते. शहरातील मुख्य रस्त्याच्या बाजूने असणाऱ्या दोन्ही नाल्यांमध्ये गाळ, कचरा मोठ्या प्रमाणात साचलेला आहे. ह्या नाल्यांची सफाई करताना फक्त कोणत्याही एका बाजूने पाणी काढण्याचे काम केले जाते. मात्र, त्यातील गाळ, प्लास्टिकसह इतर कचरा जागेवरच असतो. यामुळे डासांचे प्रमाण वाढून आजारांना निमंत्रण मिळण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील काही प्रभागांमध्ये नालेसफाईचे काम झाले असले, तरी ते व्यवस्थित झाल्याचे दिसत नाही. अद्यापही शहरातील काही नाल्यांची सफाई सुरू केलेली नाही. आरोग्य विभागाच्या नियोजनाचा बोजवारा उडाल्याने नागरिकांची गैरसोयच अधिक होत आहे.
नाल्यांची सफाई दररोज होत असल्याचा दावा
लोणार नगर परिषदेच्या आरोग्य सभापतीनी शहरातील नाल्यांची सफाई दररोज किंवा दोन दिवसांनी केल्याचा दावा केला आहे. शहरातील विविध ठिकाणी आढावा घेतला असता, नाल्यांमध्ये कचरा साचल्याने सांडपाणी पुढे जात नाही.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळत सफाईच्या नावाखाली लाखो रुपयांची देयके काढली जातात. याचे लेखापरीक्षण करण्याची मागणी केली आहे.
गजानन मापारी, शहराध्यक्ष, भाजप, लोणार
शहरात दररोज नाल्यांची सफाई केली जाते. मुख्य रस्त्यावरील नाल्यांची सफाई किमान दोन दिवसांनी केली जाते. रस्त्याचे काम सुरु असल्याने यात अडचणी येत आहेत.
फरजानाबी शेख रऊफ, आरोग्य सभापती, नगर परिषद, लोणार.