लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : शहरातील बाजारपेठेत चेन स्नॅचिंगच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. दुचाकीस्वार महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढण्याच्या घटना घडत असल्याने महिलावर्गात दहशत पसरली आहे. या घटनांमुळे पोलीसही अलर्ट मोडवर आले असून, बाजारपेठेत गस्तही वाढविण्यात आली. मागील दीड वर्षांच्या तुलनेत सोनसाखळी चोरांच्या घटनांमध्ये काहीअंशी घट आली आहे. ही घट जरी दिलासादायक असली तरी पुन्हा अनलॉकमध्ये महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे.
गेलेले मंगळसूत्र मिळतच नाही
निनावी क्रमांकाच्या दुचाकीवरून येणारे चोरटे महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पोबारा करतात. मागून चेहरा ओळखणेही कठीण असते. त्यामुळे चोरट्यांचा थांगपत्ता लागत नाही. परिणामी, चोरीला गेलेले मंगळसूत्र परत कधीच मिळत नाही.
पोलिसांनाही तपास करताना मोठ्या अडचणी निर्माण होतात. मात्र, तरीही पोलिसांनी बहुतांश गुन्ह्यांची उकल केली असून, चोरीतील दागिने परत केले आहे.