गजानन गोरे / देऊळगावराजा (जि. बुलडाणा): गत दोन महिन्यांपासून तालुक्यामध्ये विविध ठिकाणी चोरीच्या घटना होऊन दाग-दागिणे व रोख रकमेवर लाखो रुपयांचा डल्ला चोरट्यांनी मारला आहे. देऊळगावराजा पोलिसांपुढे या चोरट्यांना पकडण्याचे आव्हान उभे ठाकले असून, नागरिकांनी जागरुक राहणे गरजेचे झाले आहे. परिसरात दुबार पेरणीसह सर्वत्र दुष्काळाचे सावट पसरल्याने रोजगार आणि आर्थिक परिस्थिती ठप्प झाली. अशा स्थितीमध्ये आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी घरफोड्या आणि भुरट्या चोर्यांचे प्रमाण वाढले. ११ ऑगस्ट रोजी शहरातील आदर्श कॉलनीमध्ये भरदिवसा घरफोडी झाली. चोरटे सिनेस्टाईल प्रमाणे दुचाकीवरुन हेल्मेट घालून पाठीवर बॅग लटकवून कॉलनीत आले. त्यांनी यामध्ये ७0 हजार ५00 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळवून नेला. या घटनेला दोन दिवस होत नाही तोच अंढेरा येथे मंगळवारी रात्री कीर्तन ऐकण्यास गेलेल्या दोन नागरिकांच्या घरी चोरट्यांनी प्रवेश केला. यात रोख रक्कम व दागिणे यासह सुमारे पावनेपाच लाखाचा माल लंपास केला. याअगोदर देऊळगावराजा शहरातील माजी नगराध्यक्ष कविश जिंतुरकर आपल्या परिवारासह बाहेरगावी गेले असताना चोरट्यांनी घरात घुसून श्री महावीर भगवान यांची पंचधातूची मूर्ती चोरुन नेली. यासह मारोती ओमणीची चोरी, वाहनांचे टायर चोरीस जाणे, आठवडी बाजार तथा बसस्थानकावर मोबाइल चोरीस जाणे, पाकीटमारीचे प्रमाण वाढले. ८ ऑगस्ट रोजी चिखली रोडवरील एका किराणा दुकानामधील चोरीत ३२ हजार ५00 रुपयांचा ऐवज लंपास होण्याची घटना असे अनेक प्रकार शहर परिसरात घडले आहेत. सर्वसामान्य नागरिकांना पोलीस प्रशासनाकडून अपेक्षा आहेत; मात्र पोलिसांचा वाढता ताण संख्याबळ कमी असल्याने पोलीस प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही. यासाठी नागरिकांनी स्वत: सुद्धा जागरुक राहणे गरजेचे आहे.
दोन महिन्यांमध्ये लाखोंचा ऐवज लंपास!
By admin | Published: August 14, 2015 12:16 AM