- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा : महिलांना सक्षम व स्वयंपूर्ण होण्यासाठी शासनाने उमेद अभियान हाती घेतलेले आहे. राज्यात एकूण १ लाख ८१ हजार बचत गट कार्यरत असून, या बचत गटांकरिता वर्षभराचा निधी २०० कोटी रुपयांच्यावर प्राप्त होत आहे. त्यामुळे नवनवीन उद्योग उभारण्यासाठी महिलांना हातभार मिळत आहे. त्याचबरोबर लाखो महिलांच्या उद्योग, व्यवसायाला ‘उमेद’ मिळाल्याचे दिसून येत आहे.गरिबांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा व त्यातून त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होऊन उपजीविकेत सुधारणा व्हावी, यासाठी ग्रामीण जीवनोन्नती अभियान शासन स्तरावरून राबविण्यात येते. यातूनच बचत गटाला चालना देण्यासाठी राज्यात उमेद अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानात गरिबी निर्मूलनाचा विचार करण्यात आला असून, समुदाय विकासापासून शाश्वत उपजीविका निर्माण करण्यापर्यंतच्या सर्व बाबींचा समावेश आहे. बचत गटाद्वारे महिलांचे संघटन करून त्यांच्यातील उद्योग व्यवसायाला चालना देण्यात येते. राज्यात उमेद अभियानांतर्गत सुमारे १ लाख ८१ हजार बचत गट स्थापन करण्यात आलेले आहेत. शासन स्तरावरून या बचत गटांना वेळोवेळी निधी पुरविण्यात येतो. त्यामुळे खऱ्या अर्धाने बचत गटाच्या महिलांना उद्योगासाठी चालना मिळत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या तीन वर्षांत या बचत गटासाठी ६१२.३१ कोटी रुपये निधी प्राप्त करून देण्यात आला आहे. त्यामध्ये २०१५-१६ मध्ये २०१.०५ कोटी रुपये निधी प्राप्त झाला होता. त्यापैकी १६१.९१ कोटी खर्च करण्यात आला. २०१६-१७ मध्ये प्राप्त निधी २०८.१४ कोटी रुपये असून, १८७.४९ कोटी खर्च करण्यात आला. २०१७-१८ मध्ये २०३.१२ कोटी रुपये निधी प्राप्त झाला होता. त्यापैकी १४४.२३ कोटी रुपये खर्च करण्यात आला. ग्रामीण विकास विभागांतर्गत सुरू असलेल्या या अभियानामुळे महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे.
लघू उद्योजक प्रवाहातबचत गटाच्या माध्यमातून उमेद अभियानामुळे लाखो उद्योजकांचे उद्योग मुख्य प्रवाहात आले आहेत. गतवर्षी ५१ हजार २२० स्वयंसाहाय्यता गटांची स्थापना करण्यात आली असून, त्यामध्ये ५ लाख ७४ हजार ४२० सदस्य कार्यरत आहेत. या सदस्यांना उपजीविकेचे मोठे साधन उपलब्ध झाल्याचे दिसून येत आहे.