डोणगाव : मेहकर तालुक्यातील कनका येथील जि.प. मराठी उच्च प्राथमिक शाळेत व ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप तोडून अज्ञात चाेरट्यांनी लाखाे रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना ३० जून रोजी रात्रीच्या सुमारास समाेर आली. १ जुलै रोजीच्या सकाळी शाळेशेजारी असलेल्या नागरिकांना सकाळी शाळांचे दरवाजे उघडे दिसल्याने चाेरीची घटना समाेर आली़
कनका येथील जिल्हा परिषद शाळेचे कुलूप ताेडून ऐवज लंपास केला़ यामध्ये दोन टीव्ही संच, एक मॉनिटर, एक ओव्हर प्रोजेक्टर व १४ व्या वित्त आयोग अनुदानातून ग्रामपंचायतीकडून दिलेले दोन टीव्ही संच चाेरट्याने लंपास केलेे. याबाबतीत डोणगाव पोलीस स्टेशनला तक्रार केली असता डोणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस यांनी घटनास्थळाची पाहणी केली़ कोरोनामुळे शाळेत विद्यार्थी येत नाहीत. शाळेत फक्त शिक्षकच हजर राहण्याचे आदेश असल्याने ३० जून रोजी सर्व शिक्षक हजर होते. मात्र ३० जून रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने शाळेत चोरी करून विद्यार्थ्यांचे शिकवणीचे साहित्य चोरून नेले. त्यामुळे पुढे शाळा सुरू झाल्या तर विद्यार्थ्यांना उपकरणाद्वारे शिकवणीस अडचणी निर्माण होतील व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल, असे मुख्याध्यापक शरद काळे यांनी सांगितले़