देऊळगाव कुंडपाळ : परिसरात ८ जून राेजी झालेल्या जाेरदार पावसामुळे शेत तलाव फुटल्याने जमीन खरडून गेली़ त्यामुळे, शेतकऱ्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले़
देऊळगाव कुंडपाळ परिसरात ८ जून रोजी मुसळधार पाऊस झाल्याने डाग शिवारातील शेत तलाव फुटून मोठ्या प्रमाणात जमिनीचे नुकसान झाले आहे़ विठ्ठल कैलास सरकटे, कैलास मानीकराव सरकटे, अनिल प्रकाश सरकटे, विलास गणेशराव सरकटे यांचे शेत खरडून गेले आहे़
जनार्दन गणेशराव सरकटे यांच्या शेतामध्ये कृषी विभागामार्फत शेत तलाव तयार करण्यात आला आहे़ परिसरामध्ये ८ जून रोजी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली़ त्या अतिवृष्टीत जनार्दन गणेशराव सरकटे यांच्या शेतातील शेत तलाव फुटून शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत़ त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जमीन पेरणी योग्य राहिली नाही़ तसेच जमिनीवर टाकलेले चाळीस
ट्रॉल्या शेणखत ही वाहून गेले आहे़ याबाबत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे झालेल्या नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
कृषी सहाय्यक कुमारी वायाळ, सरपंच शेषराव डोंगरदिवे , ग्रामपंचायत सदस्य अमोल सरकटे ,ज्ञानेश्वर गाढवे, विष्णू जायभाये यांनी नुकतीच नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली असून नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी केली आहे.
याबाबत कृषी संपर्क साधला असता सदर बाब कृषी विभाग महसूल विभाग आणि सिंचन विभाग यांचे संदर्भातली असून संयुक्त पंचनामा करावा लागेल असे सांगितले़ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी हाेत आहे़