लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : गावातील तरुणपिढी दारू व्यसनाच्या आहारी जात असल्याने यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याचे पाहून लांजुड येथील महिलांनी गावातून दारू कायमची हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे. दारूबंदीकरिता लांजुड ग्रा.पं.ने नुकताच ठराव घेतला आहे.खामगाव तालुक्यातील लांजुड या गावची साडेचार हजारांच्या जवळपास लोकसंख्या आहे. गावात गेल्या ३० वर्षांपासून परवानाधारक दारूचे दुकान आहे. दारूच्या व्यसनामुळे गावात आतापर्यंत अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. दारुड्यांचा इतरांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो. लग्न, सार्वजनिक कार्यक्रम अशा ठिकाणी तर दारुड्यांमुळे कार्यक्रमात व्यत्यय होतो. दारूच्या व्यसनाचा महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. सध्या तर तरुणपिढी दारूच्या आहारी जात असल्याने आई-वडिलांना चिंता लागली आहे. आतापर्यंत गावात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. मात्र, यापुढे दारू कायमची गावातून हद्दपार करण्याचा महिलांनी निर्धार केला. ४० ते ५० महिलांनी एकत्र येऊन दारूबंदी करण्यासाठी व गावातून दारूचे दुकान हटविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. दारूचे दुकान हे अंगणवाडी, हनुमान मंदिर व ग्रा.पं. जवळ असल्याने याचा नागरिकांना त्रास होत आहे.१ जुलै रोजी लांजुड ग्रा.पं.ची ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेत उपसरपंच विठ्ठल थेराकार यांच्या अध्यक्षतेखाली दारूबंदीच्या ठरावावर चर्चा करण्यात आली. निर्मलाबाई काठोळे या सूचक, तर कुसुमबाई गुरेकार यांनी अनुमोदन दिले. गावकऱ्यांच्या संमतीने ग्रामसभेत दारुबंदीचा ठराव घेण्यात आला व तो मंजूर करण्यात आला. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष बाळू आखरे, अशोक पाटील, अनंता धामोळे, पांडुरंग धामोळे, रवींद्र थेरोकार यांच्यासह गावकरी उपस्थित होते.१०३ सह्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनलांजुड ग्रा.पं.ची लोकसंख्या साडेचार हजारांच्या जवळपास असताना गावात दारूबंदी करताना अनेकांनी काढता पाय घेतला असल्याचे दिसून येते. १ जुलै रोजी ग्रा.पं.मध्ये ग्रामसभा झाली असता, केवळ १०३ महिला-पुरुषांनी दारूबंदी करण्यासाठी सह्या केल्या आहेत. इतरांची दारूबंदीबाबत अनास्था का? असा प्रश्न चर्चिल्या जात आहे.
लांजुड गावात दारूची बाटली होणार आडवी!
By admin | Published: July 07, 2017 12:10 AM