बुलडाणा: जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १२० टक्के पाऊस पडल्याने मोठे व मध्यम प्रकल्प १०० टक्के भरल्याने यंदा रब्बी हंगामात पिकांसाठी पाण्याचे किमान तीन ते चार आवर्तने मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान येत्या १४ नोव्हेंबर रोजी पाणी आरक्षण समितीची बैठक होत असून त्यामध्ये त्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे संकेत सुत्रांनी दिली आहे.आॅक्टोबर महिन्यातच पाणी आरक्षण समितीची बैठक होणे क्रमप्राप्त होते. मात्र ग्रामपंचायतस्तरावरून पाणी आरक्षणाची मागणीच न आल्यामुळे वेळेवर धावपळ करत बुलडाणा पाटबंधारे मंडळाला वेळेवर ही बैठक पुढे ढकलावी लागली होती. ती आता १४ नोव्हेंबर रोजी होत आहे. त्यामध्ये उन्हाळ््यातील संभाव्य पाणीटंचाईची शक्यता गृहीत धरता ११ पालिका, दोन नगरपंचायती आणि जळपास २५० गावांसाठी पिण्याच्या पाण्याचे आरक्षण करण्यात येणार असून उर्वरित पाणी हे रब्बी हंगामात शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी उपलब्ध करण्याबाबत नियोजन केले जाईल. प्रामुख्याने बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक १६ टक्के सिंचनाचे क्षेत्र हे मेहकर तालुक्यात असून सर्वात कमी सिंचनाखालील क्षेत्र हे शेगाव तालुक्यात आहेत. त्यादृष्टीने १४ नोव्हेंबरच्या बैठकीत शेती सिंचनासाठी पाणी सोडण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील मोठे व मध्यम प्रकल्पात १०० टक्के जलसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 2:30 PM