बुलडाणा: नागपूर-मुंबई या द्रुतगती अर्थात समृद्धी महामार्गाचे बहुतांश ठिकाणच्या भूसंपादनाची कारवाई अंतिम टप्प्यात आली असून आता राज्यात जवळपास १३ ठिकाणी नवनगर निर्माणाच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. बुलडाणा जिल्ह्यात दोन ठिकाणी या मार्गालगत नवनगर निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती समुद्धी महामार्गचे जिल्हा समन्वयक मधुसूदन खडसे यांनी दिली. राज्यामध्ये समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया प्रभावी व गतीमानपणे राबविण्यात बुलडाणा जिल्हा हा अव्वल ठरलेला आहे. त्यानुषंगाने आतापर्यंत ९० टक्के जमीनचे भूसंपादन झालेले असून उर्वरित १२६६ हेक्टर जमीन उपविभागीय अधिकारी स्तरावर थेट ताबा घेऊन मुल्यांकनानुसार त्याची रक्कम संबंधितांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याचेही सुत्रांनी स्पष्ट केले आहे. समुद्धी महामार्गासाठी आवश्यक असणारे महत्त्वाचे भूसंपादन जवळास पूर्णत्वास गेले आहे. त्यामुळे ताब्यात घेण्यात आलेल्या जमीनीची सफाई, समपातळी करण्यासोबतच या जागेवरील अडथळे दूर करण्यासोबतच वृक्ष तोडीची कामे सुरू झाली आहेत. या व्यतिरिक्त सॉईल टेस्टींगचेही काम सध्या वेगाने सुरू झाले आहे. यामध्ये जमीनीची प्रत व जमीवर किती खोलीवर खडक आहे, याची तपासणी प्रामुख्याने केली जात आहे. भूसंपादनासंदभातील अखेरच्या टप्प्यातील कामे येत्या १५ ते २० दिवसात पूर्णत्वास जात असून त्यानंतर भूसंपादन प्रक्रियेशी संबंधीत कर्मचारी आणि अधिकारी यांच्याकडे नवनगर निर्माणासाठी लागण्यार्या जमीनीचे भूसंपदान करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात येणार आहे. यासोबतच नगर रचना विभागाचे टाऊनशीपचा प्लॅन तयार करण्याच्या कामासही आगामी काळात प्रारंभ होणार आहे. प्रामुख्याने रस्त्याच्या संदर्भातील कामे प्रथमत: पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर टाऊनशीप डेव्हलपच्या कामाला प्राधान्य देण्यात येईल, असे सुत्रांनी सांगितले. बुलडाणा जिल्ह्यातील चार तालुक्यातून जवळपास ८७ किलोमीटर समृद्धी महामार्ग गेला आहे. या मार्गावर मेहकर तालुक्यातील साब्रा, काब्रा, फैजलपुर आणि सिंदखेड राजा तालुक्यातील सावरगाव माळ, निमखेड, गोळेगाव परिसरात एक याप्रमाणे दोन नवनगर उभारण्यात येणार असून त्यासाठी ५०० हेक्टरच्या आसपास जमीनीची गरज भासणार आहे. भूसंचन पद्धतीने ही जमीन घेण्यात येणार असल्याचे समुद्धी महामार्गाचे जिल्हा समन्वयक मधुसूदन खडसे यांनी स्पष्ट केले.
समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून जमिनीची सफाई आणि सॉईल टेस्टींगसोबतच त्यातील वृक्षतोडीची कामे हाती घेण्यात आली आहे. ही रस्त्याची कामे पूर्णत्वास गेल्यानंतर नवनगर निर्माणासंदर्भात खर्या अर्थाने काम सुरू होईल.
- मधुसूदन खडसे, जिल्हा समन्वयक, समृद्धी महामार्ग, बुलडाणा