- नीलेश जोशी
बुलडाणा: खंबातच्या आखातात वाहून जाणारे तापी-पूर्णा नदी खोर्यातील पुराचे पाणी मध्यप्रदेश, महाराष्ट्रातील तीन लाख दहा हजार हेक्टर जमिनीवर पूनर्भरण (मेगा रिचार्ज) करण्याच्या दृष्टीने उपयुक्त असलेल्या महाकाय पूनर्भरण योजनेचे सर्व्हेक्षण अंतिम टप्प्यात आले आहे. तापी व शिंपणा नदीच्या संगमावर खारिया घुटीघाट येथे प्रस्तावीत असलेल्या डायर्व्हशन वेअर अर्थात बंधार्यावरून उजव्या व डाव्या कालव्याद्वारे हे पाणी जमिनीमध्ये तथा तलावांमध्ये पुनर्भरण करण्यात येईल. त्यासंदर्भातील २३२ किमी लांबीच्या कालव्याचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले असून सध्या २६० किमी लांबीच्या उजव्या कालव्याचे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. उजव्या व डाव्या कालव्याचे हे सर्व्हेक्षण पूर्ण झाल्यानंतर सुमारे पाच हजार ४२८ कोटी रुपयांच्या या मेगा रिचार्ज स्कीमचा डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) बनविण्यास प्रारंभ होईल. १२ ते १८ आॅक्टोबर दरम्यान ते पूर्ण होणार असून हेलिकॉप्टरवर लीडॉर यंत्र बसवून त्याद्वारे हे हवाई सर्व्हेक्षण केले जात आहे. केंद्र सरकारच्या वाप्कोस (डब्ल्यूएपीसीओएस) संस्थेतंर्गत जळगाव येथील तापी पाटबंधारे विकास महामंडळातंर्गत हे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. जलसंधारण मंत्रालयाने १३ जानेवारी २०१६ रोजी पूर्व संभाव्यता अहवालास संमती दिल्यानंतर तापी पाटबंधारे विकास महामंडळास योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्याचे निर्देश देण्यात आले असून त्यातंर्गतच या महाकाय पूनर्भरण योजनेचे सर्व्हेक्षण, अन्वेषण व सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी पथक गठीत करण्यात आले असून त्याद्वारे हे सर्व्हेक्षण होत आहे. यामध्ये उजव्या व डाव्या कालव्याचे संरेखां सर्व्हेक्षण सध्या केले जात आहे.
अशी आहे योजना
खारिया घुटीघाट येथे तापी व शिंपणा नदीच्या संगमाजवळ डायर्व्हशन वेअर (बंधारा) उभारू त्यात पाणीसाठवण्यात येईल. या बंधार्यावरून २३२ किमी लांबीचा खारिया घुटीघाट ते अनेर धरण, जळगाव पर्र्यंत उजवा आणि खारिया घुटीघाट ते अचलपूर पर्यंत २६० किमी लांबीचा कालवा काढून ठिकठिकाणी नदी, नाल्यात पूनर्भरणासाठी पाणी सोडण्यात येऊन खालावलेली भूजल पातळी उंचावण्यावर भर दिला जाईल. यामुळे महाराष्ट्रातील दोन लाख १३ हजार ७०६ हेक्टर व मध्यप्रदेशातील ९६ हजार ८२ हेक्टर अशा तीन लाख ९ हजार ७८८ हेक्टर क्षेत्रास अप्रत्यक्षरित्या पुनर्भरणाद्वारे फायदा होणार आहे.
वॉटरशेडच्या अभ्यासानंतर योजना आकारास
केंद्रीय भूजल मंडळाने १९९५ मध्ये टीई-१७-वॉटरशेडचा अभ्यास केला होता. त्यामध्ये प्राप्त निष्कर्षाच्या आधारावर तापी पाटबंधारे विकास महामंडळातर्गत ही महाकाय पूनर्भरण योजना प्रस्तावीत करण्यात आली आहे. केंद्रीय भूजल मंडळाने केलेल्या अभ्यासातंर्गत जळगाव खान्देश जिल्ह्यातील एकट्या यावल तालुक्यात असलेल्या वॉटरशेडमध्ये ८० एमएम क्यूब जलपूनर्भरण करण्याची क्षमता असल्याचे निदर्शनास आले होते. खारिया घुटीघाट ते अनेर धरण आणि अचलपूर पर्यंतच्या पट्ट्यात जवळपास असे १०० वॉटरशेड आहेत. त्यामुळे या भागात व्यापक प्रमाणावर जल पूनर्भरणाचा कार्यक्रम हाती घेतल्या जाऊ शकतो. ही बाब अभ्यासाअंती समोर आल्याने या योजनेला आता मुर्तस्वरुप प्राप्त होत आहे. मात्र त्यासाठी तब्बल २८ वर्षांचा कालावधी लागला ही वस्तूस्थिती आहे.
उजव्या व डाव्या कॉलव्याचे लीडॉर तंत्रज्ञानाद्वारे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. उजव्या कालव्याचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले असून डाव्या कालव्याचेही १८ आॅक्टोबरपर्यंत पूर्ण होईल. केंद्रीय भूजल मंडळाने १९९५ मध्ये वॉटरशेडच्या केलेल्या अभ्यासाअंती महाकाय पूनर्भरन योजना आकारास येत आहे.
- जी. एस. महाजन, कार्यकारी अभियंता, तापी खोरे सर्व्हेक्षण व अन्वेषण विभाग पथक, जळगाव