बुलडाणा : जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात अस्मिता सॅनीटरी नॅपकीन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हा परिषदेच्यावतीने रॅली, महिला आरोग्य कक्षाची स्थापना, सॅनीटरी पॅड व वेंडींग मशीनचे लोकार्पण आदी कार्यक्रमही यावेळी पार पडले. अस्मिता योजनेचा शुभारंभ जि.प. अध्यक्षा उमाताई तायडे, उपाध्यक्षा मंगलाताई रायपूरे, महिला व बालकल्याण सभापती श्वेताताई महाले, मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन आदींच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी जि.प सदस्या डॉ. ज्योती खेडेकर, शिनगारे, पुनम राठोड, उपमुख कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे राहूल साकोरे, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र सांगळे आदी उपस्थित होते. आरोग्य विभाग व महिला, बालकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाच्या रॅलीचे आयोजन जिल्हा परिषदेच्या आवारात करण्यात आले होते. जिल्हा परिषदेमध्ये महिला आरोग्य कक्षाची स्थापना करून सॅनीटरी पॅड व्हेडींग मशीनचे उद्घाटन करण्यात आले. सॅनीटरी पॅड व्हेडींग मशीन उपक्रम हा जिल्हा परिषदेचा आदर्श उपक्रम असून या उपक्रमाचा सर्व खर्च जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी पतसंस्था यांनी केलेला आहे. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.