बुलडाणा : जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत २०२१-२२ मध्ये रेशीम शेतीसाठी लाभार्थी निवड करण्यासाठी महारेशीम अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी एस.राममूर्ती यांच्याहस्ते महारेशीम अभियानाचे रेशीम रथास हिरवा झेंडी दाखवून सोमवारी उद्घाटन करण्यात आले. अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी उपजिल्हाधिकारी (रोहयो) अनिल माचेवाड, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, प्रकल्प अधिकारी सुनील दत्त फडके, भैरूलाल कुमावत, मुकुंद घाटे, रामदास आटोळे, श्रीपाद कलंत्रे, सचिन श्रीवास्तव, शिवप्रसाद मुंगळे, पवन शिंदे, दत्तात्रय शिंदे, जगदीश गुळवे, पारवे आदी उपस्थित होते. बागायत क्षेत्र असलेल्या निवडक गावांच्या समूहामध्ये रेशीम शेतीस मोठ्या प्रमाणावर वाव असल्याने, शेतकऱ्यांनी अभियान कालावधीमध्ये रेशीम शेती करण्यासाठी नोंदणी करून मोठ्या संख्येने सहभागी करून घ्यावे, असे आवाहन याप्रसंगी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी केले. वातावरण बदलामुळे पारंपरिक शेतीमधून शेतकऱ्यांना निश्चित व शाश्वत उत्पन्न मिळणे, दिवसेंदिवस जिकिरीचे होत चालले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हमखास शाश्वत उत्पन्नाची हमी असलेल्या रेशीम शेतीकडे वळावे, असेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी स्पष्ट केले. जिल्हयात मनरेगा अंतर्गत तुती लागवडीद्वारे रेशोम कोष उत्पादन योजना राबविण्यात येत आहे.
रेशीम रथाच्या माध्यमातून जिल्हाभर जनजागृती रेशीम अंडीपुजांसाठी ७५ टक्के व कोष उत्पादनावर प्रति किलो कोषास ५० रुपये जिल्हा वार्षिक योजनेमधून अनुदान देण्यात येत असल्याचे प्रकल्प अधिकारी सुनील फडके यांनी सांगितले. अभियान कालावधीमध्ये रेशीम शेतीस वाव असलेल्या निवडक गावामध्ये रेशीम शेती करण्यसाठी रेशीम कर्मचारी, शास्त्रज्ञ, रेशीम उद्योजक व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने रेशीम रथाच्या माध्यमातून जिल्हाभर विस्तार कार्यक्रम घेऊन जनजागृतीद्वारे शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.