लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : शेतकऱ्यांच्या मालाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाने नवीन योजना आखली आहे. यामध्ये ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेवर आधारित कृषी विभागाद्वारे योजनांची अंमलबजावणी सुरू आहे. राज्य शासनाच्या या धोरणाचाच एक भाग म्हणून तालुक्यातील कोलारा येथे कृषी विभागावतीने संत सावता माळी रयत बाजार शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीचे उद्घाटन २४ जानेवारी रोजी करण्यात आले आहे.
कृषी विभागाच्या पुढाकाराने कोलारा येथील सिद्धेश्वर महाराज मंदिर परिसरात आठवड्यातीन दोन दिवस रविवार व बुधवारी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत संत सावतामाळी रयत बाजार भरविण्यात येणार आहे. या अभियानाचा शुभारंभ २४ जानेवारी रोजी पार पडला. यावेळी तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे, साहेबराव पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रा.प.सदस्य व गावातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते. भाजीपाला व फळपीक विक्रेते परिहार यांनी थाटलेल्या दुकानाचे यावेळी उद्घाटन पार पडले. या अभियानामुळे शेतकऱ्यांना आता गावातच भाजीपाला विक्री करता येणार आहे. याद्वारे त्यांचा वाहतूक खर्च वाचण्यासह गाव व परिसरातील ग्राहकांना ताजा व उत्तम प्रतीचा भाजीपाला, फळपीक कमी किमतीत मिळणार आहे. त्यामुळे भाजीपाला व फळपीक शेतकरी विक्रेता व ग्राहक दोघांचा फायदा लक्षात घेता, जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी थेट ग्राहकांना भाजीपाला व फळ विक्री करण्यासाठी या बाजारचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे यांनी यावेळी केले. यशस्वितेसाठी कृषी पर्यवेक्षक टाले, गजानन इंगळे, कृषी सहायक लोढे मॅडम यांनी परिश्रम घेतले.