कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची प्राथमिक स्थितीची लक्षणे फार सौम्य असतात. त्यामुळे प्राथमिक तपासणीमध्ये रुग्णाला कोरोनाची लागण झाली किंवा नाही, हे स्पष्ट होत नाही. त्रास वाढल्यानंतर आरटीपीसीआर तपासणीसाठी स्वॅब दिला जातो. चाचणीचा निष्कर्ष येण्यास विलंब लागतो व तोपर्यंत लागण झालेल्या व्यक्तीच्या रोगाची पातळी वाढलेली असते. काही रुग्ण तर जिवघेण्या परिस्थितीत गेलेले असतात. त्यामुळे रुग्णांच्या स्वॅबचे तातडीने परीक्षण होऊन निदान होणे अत्यंत आवश्यक असल्याने चिखलीसह इतर तालुकास्तरावर आरटीपीसीआर तपासणी लॅब सुरू करावी, अशी मागणी आमदार श्वेता महाले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे. तालुकापातळीवर अशा प्रकारच्या लॅब सुरू झाल्यास बाधित रुग्णाचे निदान लवकर होऊन त्यावर तातडीने उपचार केले जातील व रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण कमी होऊन ऑक्सिजन, रेमेडिसिवर इंजेक्शन आदी मागणी असणाऱ्या बाबींची मागणीदेखील कमी होईल, असेही आ. महाले यांनी पत्रात नमूद केले आहे.
तालुकानिहाय आरटीपीसीआर स्वॅब तपासणी लॅब सुरू करा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 4:36 AM