चिखली : कोविडच्या दुसऱ्या लाटेत अनेक लोकांना ऑक्सिजनअभावी आपले प्राण गमवावे लागले. यामुळे ऑक्सिजनचे महत्त्व मोठ्या प्रमाणावर अधोरेखित झाले. या पार्श्वभूमीवर अनेक निसर्गप्रेमी आणि डॉक्टरांनीदेखील वातावरणात ऑक्सिजनचे फेरभरण होण्यासाठी आणि दीर्घकालीन उपाय म्हणून एकतरी झाड लावा, असे आवाहन करत होते. या आवाहनास प्रतिसाद देण्याची वेळ सध्या येऊन ठेपली असून, ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या वृक्षांची लावगड या पावसाळ्यात होणे गरजेचे आहे.
त्या अनुषंगाने शेतकरी विकास मदत व मार्गदर्शन केंद्राव्दारे नेमकी कोणती झाडे लावावीत व त्यांचे फायदे काय, याबाबत जनजागृती देखील केली जात आहे. गत दोन वर्षांपूर्वी वृक्षलागवडीची मोहीम मोठ्या प्रमाणावर आणि स्वयंप्रेरणेने राबविण्यात येत होती. यामध्ये राज्य शासनाचाही मोठा वाटा होता. मात्र, कोरोनामुळे गत दोन वर्षांपासून वृक्षारोपणाच्या मोहिमेला खीळ बसली आहे. तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची वेळ आली आहे. तथापी वृक्षांच्या अभावाने ऋतुचक्र बिघडले असल्याने सध्या पाऊसदेखील भाग बदलून पडत आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड होणे, हा दीर्घकालीन उपाय मानला जात आहे. सोबतच सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने हे दिवस वृक्षारोपणासाठी उपयुक्त असल्याने यंदाच्या पावसाळ्यात वातावरणात ऑक्सिजनचे फेरभरण करणारा एकतरी वृक्ष लावूया, असे आवाहन निसर्गप्रेमींकडून होत आहे.
या पावसाळ्यात झाडे लावायची इच्छा आहे?
या पावसाळ्यात झाडे लावायची इच्छा आहे; परंतु, नेमकी कोणती झाडे लावावीत, याबाबत संभ्रम अनेकांना असतो. हा संभ्रम दूर करण्यासाठी शेतकरी विकास मदत व मार्गदर्शन केंद्र, महाराष्ट्र राज्य यांनी अरण्यामहर्षी मारती चितमपल्ली यांनी सुचविलेल्या झाडांबाबत माहिती देऊन ती झाडे लावण्याबाबत आवाहन केले आहे.
जीवनदायी वृक्ष!
शेतकरी विकास मदत व मार्गदर्शन केंद्राने जारी केलेल्या झाडांच्या माहितीमध्ये वड, उंबर, पाखर, नंद्रुक आणि पिंपळ हे वृक्ष जीवनदायी असल्याने त्यांची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. बारा तासांपेक्षा अधिक काळ प्राणवायू देणाऱ्या झाडांमध्ये वड, उंबर, नांद्रुक, पिंपळ, कदंब व कडूनिंबाचा समावेश आहे.
रस्त्याकडेला लावण्यास योग्य झाडे
वड, उंबर, पाखर, पिंपळ, बेल, कदंब, शमी, आपटा, चिंच, तर उद्यानात पारिजातक, बकुळ, आवळा, उंबर, अमलतास, बांबू (पिवळा) आणि घराभोवती लावण्यास रक्तचंदन, चंदन, उंबर, बकुळ, पारिजातक, बेल, कुसुंब ही झाडे उपयुक्त आहेत. खजुरिया, शिंदी, ताडफळ, बांबू, हादगा, शेवरी, शेवगा हे वृक्ष जलदगतीने वाढणारे आहेत.
औषधी व वनशेती उपयुक्त झाडे
हिरडा, बेहडा, आवळा, अर्जुन, कडूनिंब, करंज, रिठा हे वृक्ष औषधी गुणधर्माचे, तर आवळा, अंजीर, फणस, चिंच, खिणी, खजुरिया, शिंदी, तुती ही झाडे वनशेती उपयुक्त आहेत.