साखरखेर्डा : सिंदखेडराजा आणि देऊळगाव राजा तालुक्यात काेराेना संसर्ग माेठ्या प्रमाणात वाढत आहे़ या तालुक्यातील अनेक काेराेनाग्रस्त रुग्ण औरंगाबाद, जालना येथील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत़ काेराेना रुग्णांबराेबर आलेल्या नातेवाईकांचे औरंगाबाद येथे माेठ्या प्रमाणात हाल हाेतात़ बुलडाणा जिल्ह्यातील काेराेनाग्रस्तांच्या नातेेवाईकांसाठी साखरखेर्डा येथील युवकाने लाॅनच खुले केले आहे़ तसेच त्यांना माेफत भाेजनही देत आहे़
साखरखेर्डा येथील रंगनाथ सोरमारे यांनी बसस्थानकावर एक चहाची टपरी लावून मुलांना शिक्षण दिले. औरंगाबाद येथे शिक्षण घेत असलेल्या प्रल्हाद सोरमारे या मुलाने हाॅटेल मॅनेजमेंटचा कोर्स करुन छोटासा व्यवसाय थाटला. त्यातच ग्रामीण भागातील गरजू युवकांची, राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था व्हावी म्हणून रोजगार मिळावा या उद्देशाने एक टीम तयार करून कॅटरींगचा व्यवसाय सुरु केला. त्यात आर्थिक परिस्थिती जेमतेम असताना लाॅन आकारास आले. ग्रामीण भागातील रुग्ण उपचारासाठी औरंगाबाद शहराकडे धाव घेत आहेत. रुग्ण कोविड सेंटरमध्ये भरती केल्यानंतर आलेल्या व्यक्तींची परवड सुरू हाेते. राहण्याची व जेवणाची सोय लागत नाही. नातेवाईक शहरात असले तरी कोरोनाच्या भीतीने संपर्कात येत नाही. अशा बिकट परिस्थितीत प्रल्हाद सोरमारे यांनी बुलडाणा जिल्ह्यातील कोविड सेंटरमध्ये भरती करण्यात आलेल्या रुग्णांसाठी आणि नातेवाईकांसाठी शिवम लाॅनमध्ये भोजनाची व्यवस्था केली. एवढेच नव्हे, तर सोशल मीडियाच्या माध्यमातून रुग्णांच्या नातेवाईकांना संपर्कासाठी आवाहन केले. राहण्याची कोठेही व्यवस्था झाली नाही तर कोरोना नियमांच्या अटी बंधनकारक ठेवून आणि निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र असल्यास त्यांना राहण्याची व्यवस्थासुध्दा त्यांनी केली आहे.