गजानन कलोरे शेगाव, दि. ३१-श्री गजानन महाराज संस्थानमध्ये ३0 रोजी लक्ष्मीपूजनाचा सोहळा पारंपारीक पध्दतीने यावर्षीही उत्साहात व मंगलमय वातावरणात पार पडला. संध्याकाळी झालेल्या या सोहळ्याप्रसंगी संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्यासह इतर विश्वस्त व भाविकांची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती.दिवाळीनिमित्त श्रींच्या मंदीरावर नयनरम्य व दैदिप्यमान विद्युत रोषनाई करण्यात आली होती. ही आरास उपस्थित भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. मांगलीक वातावरणात शिस्तबध्द पध्दतीने श्रींच्या मंदीरात दिपावलीच्या निमित्ताने संस्थानच्या कार्यालयात पारंपारीक पध्दतीने लक्ष्मी देवीची मुख्यपुजा कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या उपस्थितीत विश्वस्त विश्वेश्वर त्रिकाळ यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी विश्वस्त नीळकंठदादा पाटील, नारायणराव पाटील, गोविंदराव कलोरे, चंदुलाल अग्रवाल, सदस्य अभियांत्रिकी महाविद्यालय शरद शिंदे, रामेश्वर काठोळे, भक्तगण आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती.यावेळी संस्थानमधील हत्तीण 'लक्ष्मी'चे पूजन शिवशंकरभाऊ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी भक्तांनी शिस्तबध्द पध्दतीने पुजेचे दर्शन घेतले. संस्थानच्यावतीने प्रत्येक भक्तांना कुंकुमतीलक करण्यात आले. तसेच लाही मुरमुरे बत्ताशाच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. मंदीर परिसरात संस्थानच्या वाहनांची रांगेत पुजा करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे गावातील रहिवाशांनी श्रींच्या मंदीरात पुजेचे दर्शन रात्री उशिरापर्यंत घेतले. मंदीर परिसर भक्तांनी फुलून गेला होता. मंदीर परिसरात व भक्तनिवास परिसरात केळीचे खांब व दिपमाळा आकर्षण ठरले.
गजानन महाराज संस्थानमध्ये लक्ष्मीपूजन सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2016 12:03 AM