लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शहरातील अंतर्गत रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडल्याने नागरिकांना प्रचंड गैरसोय सहन करावी लागत आहे. खड्ड्यांमधून मार्ग काढताना वाहनधाकांची चांगलीच कसोटी लागत आहे. पालिका प्रशासनाने रस्ता बांधकामासाठी तीन वेळेस निविदा काढल्या. मात्र कुणीच ठेकेदार मिळाला नसल्याने काम थंडबस्त्यात पडले आहे. नागरिकांचा रोष पाहता पालिकेने तहसील - संगम चौक रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये मुरुम टाकून तात्पुरती मलमपट्टी केली आहे.बुलडाणा शहर सध्या खड्ड्यांच्या दुखण्यामुळे त्रस्त झाले आहे. शहरातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यातून मार्ग काढतांना दुचाकी व चारचाकी वाहनांच्या चालकांना कसरत करावी लागत आहे. सर्वच वर्दळीच्या रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. पायदळ चालणाऱ्यांसह वाहनधारकांना खड्डयांमुळे गैरसोय सहन करावी लागत आहे. खड्ड्यांची दुरुस्ती करण्याबाबत अनेकदा पालिका प्रशासनाकडे मागणी करण्यात आली. मात्र पालिकेकडून दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण झाली आहे. एक खड्डा चुकवला तर दुसरा पुढे आहेच. त्यामुळे खड्डे चुकवावे तरी किती, असा प्रश्न वाहनधारकांना पडला आहे. पावसाचे पाणी खड्ड्यात साचल्याने खड्डा दिसत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खड्ड्यांमुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. बसस्थानक ते चिंचोले चौक, गजानन महाराज मंदिर रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. संपूर्ण रस्त्यावर खड्डे पडलेले आहे. अनेक वर्षापासून या रस्त्याची डागडूजी केलेली नाही. खड्डे दुरुस्त केले नसल्याने वाहन चालवतांना अडचणी येतात. खड्ड्यांची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने होत आहे.तहसील कार्यालय ते संगम चौक हा कायम वर्दळीचा रस्ता आहे. दररोज हजारो वाहने या रस्त्यावरुन ये- जा करतात. परंतू या रस्त्याला खड्ड्यांचे ग्रहण लागलेले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे ग्रहण सुटलेले नाही. संपूर्ण रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात जाण्यासाठी हाच रस्ता आहे. बाहेरगावावरुन येणारे रुग्ण याच मार्गाने दवाखान्यात जातात. रस्त्यावरील खड्ड्यांमधून मार्ग काढत त्यांना जावे लागते. तहसील कार्यालयात विविध दाखले काढण्यासाठी आलेल्या नागरिकांना याच मार्गावरुन जावे लागते. या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी सातत्याने होत होती. त्यामुळे पालिकेने तात्पुरता मुरुम टाकून या रस्त्यावरील खड्डे बुजविले आहेत. पावसाळा सुरु असल्याने खड्ड्यातील मुरुम किती दिवस टिकू शकेल असा प्रश्न उपस्थित होत आहे.(प्रतिनिधी)शहरातील रस्त्यांची दुरुस्ती, खड्डे बुजविणे याबाबत तीन वेळा निविदा काढण्यात आल्या होत्या. नवीन निविदा प्रक्रिया जवळपास पूर्णत्वास आली आहे. सध्या तात्पुरता मुरुम टाकून खड्डे भरले आहे.- योगेश देशमुख, कनिष्ठ अभियंता
बुलडाणा शहरातील खड्ड्यांच्या जखमेवर मुुरुमाची मलमपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 3:48 PM