लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: एका जबरी चोरी प्रकरणात दोन वर्षांपासून फरार असलेल्या अट्टल गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून, त्यास चिखली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी चालकांना थांबवून त्यांना हा आरोपी लुटत होता. त्याच्या अटकेमुळे चिखलीसह जिल्ह्यात झालेल्या काही लुटमारीच्या घटनांचाही छडा लागण्याची शक्यता आहे. गणेश भारत फोलाने असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो चिखली शहरातील संभाजीनगरमधील रहिवाशी आहे. दरम्यान, तो चिखली शहरात आला असल्याची माहिती चिखली परिसरात गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली असता, या पथकाने खारतजमा करून त्यास ताब्यात घेत चिखली पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.चिखली पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा मे, २०१९ मध्ये दाखल करण्यात आला होता. चिखली शहरात बाजार समितीजवळून दुचाकीवर जात असताना कोलारा येथील श्रीकृष्ण मधुकर सोळंकी (२९) यांना अचानक एका व्यक्तीने थांबवून तंबाखूबाबत विचारणा केली होती. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आणखी दोघे जण आले होते. दुचाकीस कट का मारला, अशी विचारणा करून सोळंकी यांच्या खिशातून रोख पाच हजार रुपये आरोपींनी काढून घेतले होते. प्रकरणी श्रीकृष्ण सोळंकी यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या घटनेनंतर आरोपी फरार होता. मात्र, तो चिखली शहरात आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली असता, त्यांनी सापळा रचून त्यास ताब्यात घेत, चिखली पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याच्या विरोधात चोरी, घरफोडी, जबरी चोरी असे काही गुन्हे दाखल आहेत.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नीलेश शेळके, नायक पोलीस कॉन्स्टेबल दीपक पवार, गजानन चतूर, विजय सोनोने, नदीम शेख यांनी ही कारवाई केली.गणेश भारत फोलानेच्या अटकेमुळे चिखली, मेहकर, देऊळगावराजा परिसरात झालल्या काही घरफोड्यांचाही तपास लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दोन वर्षांपासून फरार कुख्यात चोरट्यास एलसीबीच्या पथकाने केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 11:17 AM