राज्यातील बंजारा समाजाचे प्रमुख नेते लोणारात येणार एकत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 05:27 PM2018-08-17T17:27:06+5:302018-08-17T17:28:53+5:30
बुलडाणा : महाराष्ट्रातील सर्व बंजारा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला असून त्यादृष्टीने राज्यस्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत.
- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा : महाराष्ट्रातील सर्व बंजारा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला असून त्यादृष्टीने राज्यस्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. बंजारा समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी बंजारा समाजाचे काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते एकत्र येणार आहेत. त्यासाठी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत लोणारमध्ये नोव्हेंबरमध्ये राज्यस्तरीय मेळावा घेण्यात येत आहे. राज्यात बंजारा समाज मोठ्या संख्येने आहे. त्यांच्या विकासासाठी शासनाने शैक्षणिक, आर्थिक विकासाच्या योजना, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळांतर्गत सामाजिक विकासाच्या योजना लागू करण्यात आल्या आहेत. मात्र अनेक योजना आजही समाजातील काही लोकांपर्यंत पोहचल्या नाहीत. त्यामुळे शासनाच्या योजनांपासून बंजारा समाजाला वंचीत रहावे लागते. या समाजाच्या विकासासाठी काँग्रेसने आपले लक्ष केंद्रीत केले. महाराष्ट्रातील बंजारा समाजाला मुख्य प्रवाहात आणणे, त्यांचे प्रश्न सोडविणे यासाठी काँग्रेस पक्षाने विशेष प्रयोजन आखले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी मुंबई येथील गांधी भवन येथे राज्यातील बंजारा समाजाच्या प्रमुख नेत्यांची नुकतीच बैठक घेतली. या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस बंजारा नेते संजय राठोड, विधान परिषद आमदार हरिभाऊ राठोड, जेष्ठ नेते माजी आमदार धोंडिराम राठोड, डॉ. टी. सी. राठोड, यांनी समजाचे विविध प्रश्न मांडले. या बैठकीस शेषराव चव्हाण, प्रल्हाद राठोड, अलका राठोड, संयोगिता नाईक, मुजफ्फर हुसैन, पृथ्विराज साठे, डॉ. राम चव्हाण, किसन चव्हाण, डॉ. गणेश राठोड, छायाताई राठोड, डॉ. सुभाष पवार, राकेश राठोड, मदन जाधव, आत्माराम जाधव, प्रामिला जाधव नाईक, विजय राठोड यांची उपस्थिती होती. या बैठकीमध्ये राज्यभरातील बंजारा समाजाच्या विकासात्मक कामांचे धोरण आखण्यात आले. त्यासाठी काँग्रेसमधील सर्व प्रमुख बंजारा लोकप्रतिनिधींना एकत्र आणून त्यांचा राज्यस्तरीय मेळावा येत्या नोव्हेंबरमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील लोणार येथे घेण्यात येणार आहे. यावेळी बंजारा समाजाची भव्य रॅली काढण्यात येणार आहे. या मेळाव्याला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची उपस्थिती राहणार असल्याची माहितीही संजय राठोड यांनी दिली.
भौगोलिक परिस्थितीचा विचार करून लोणारात बैठक
काँग्रेसमधील बंजारा समाजातील प्रमुख नेत्यांच्या बैठकीसाठी भौगोलिक परिस्थितीचा विचार करुन बुलडाणा जिल्ह्यातील लोणार शहराची निवड करण्यात आली आहे. येथे राज्यातील सर्व समाजबांधवांना येणे सोयीचे आहे. सोबतच मराठवाडा व विदर्भाच्या सिमेवर लोणार आहे. बंजारा समाजाच्या लोकसंख्येचा विचार करता हे ठिकाण त्यादृष्ठीने मध्यवर्ती ठिकाण असल्याने लोणारची निवड करण्यात आली असल्याचे संकेत राठेड यांनी दिले.
नोव्हेंबरमध्ये मेळावा
बंजारा समाजाच्या विकासासाठी त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याकरिता विशेष कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये लोणार येथे काँग्रेसमधील बंजारा समाजातील प्रमुख नेते मंडळींचा मेळावा घेण्यात येणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खा. अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले असल्याचे प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस संजय राठोड यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.