बुलडाणा: कोवीड संसर्गाचे राजकारण न करता विरोधी पक्षनेत्याने केंद्राकडून हे संक्रमण रोखण्यासाठी निधी व अन्य मदत मिळवून देण्यासाठी मदत करावी, असा उपरोधीक टोला राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी दहा जुलै रोजी बुलडाणा येथे लगावला.बुलडाणा जिल्ह्यातील महिला व बाल विकास विभागाशी संबंधित विविध कामांचा आढावा घेण्यासाठी त्या बुलडाणा येथे आल्या होत्या. कोरोना संसर्गाच्या स्थितीबाबत आढावा घेतल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा टोला लगावला. खामगावचे भाजपचे आ. अॅड. आकाश फुंडकर यांनी जिल्हा प्रशासनामुळेच कोरोना संक्रमण जिल्ह्यात वाढल्याचा केलेले आरोप व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव खान्देश येथे कोवीड संदर्भात राज्य शासनाच्या धोरणावर केलेल्या टिकेच्या पार्श्वभूमीवर त्यांना विचारणा केली असता त्यांनी हा टोला लगावला.यावेळी यशोमती ठाकूर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच हल्लाबोल केला. ट्रम्पचे स्वागत आणि मध्य प्रदेशातील काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठीच मोदींनी देशात उशिरा लॉकडाऊन लावला. तो जानेवारीतच लावला असता तर देशात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नसता असे त्या म्हणाल्या. सोबतच केंद्र सरकारकडूनच राज्याला मदत व सहकार्य मिळत नाही. विरोधी पक्षनेते राज्य शासनावर ऐवढी टिका करत आहे तर त्यांनीही केंद्र सरकारकडे महाराष्ट्राला कोवीडसाठी निधी व अन्य सहकार्य करण्यासाठी भुमिका निभावून मदत करावी, असे आव्हानच एक प्रकारे त्यांनी दिले. त्यामुळे केंद्र व राज्यातील सरकारमधील एकंदरीत संबंध चांगलेच ताणल्या गेलेले आहेत, हे यावरून स्पष्ट होत आहे.मुख्यमंत्र्यांमुळेच महाविकास आघाडीचे जुळतेमुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मोठ्या मनाचे आहेत. ते मुख्यमंत्री आहेत म्हणूनच आमच महाविकास आघाडीत जुळत आहे, असेही महिला व बाल कल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या. महाविकास आघाडीत जुळवून घेणे जमते का? असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी ही बाब अधोरेखीत केली.
विरोधी पक्ष नेत्यानेच केंद्राकडून निधी मिळण्यासाठी मदत करावी- यशोमती ठाकूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 12:47 PM