गजानन मापारीलोकमत न्यूज नेटवर्कउंद्री : भारतीय संस्कृतीसह आयुर्वेदामध्ये महत्त्वाचे स्थान असलेल्या विड्याच्या पानाला आजही कुठलाही धार्मिक विधी, समारंभ, लग्नविधी, जन्म-मृत्यू विधी आदी ठिकाणी मागणी होत असते. शहरासह ग्रामीण भागात तलफसह जेवणानंतर पचनासाठी विड्याचे पान खाणार्यांची संख्या आजही कमी नाही; मात्र विड्याचे पान खाणार्या शौकिनांना महागाईचा फटका बसला असून, विड्याची तलफ परराज्यातील पानावर भागवली जात आहे.
आयुर्वेदामध्ये व पचनासाठी खाण्याच्या पानाला अत्यंत महत्त्व असल्याने विड्याच्या पानाच्या विक्रीची मोठी उलाढाल होते; मात्र या पानाचा प्रवासही मोठा रंजक आहे. पट्टी पान, कलकत्ता पान व बंगला पान या पानांचे मळे व शेती पश्चिम बंगालमध्ये असून, क पुरी पानाचे मळे आंध्र प्रदेशात आहेत. पट्टीपान, बंगला पान व कलकत्ता पान हे सर्व पश्चिम बंगालमधून कलकत्ता-नागपूर एक्स्प्रेसने नागपूर येथे येतात व सर्वात मोठी पानाची बाजारपेठ असलेल्या नागपूर येथून संपूर्ण महाराष्ट्रात पानाचे वाटप करण्यात येते. तर आंध्र प्रदेशातून पोन्नुर व मद्रास येथून ट्रकने थेट खामगाव विड्याची पाने येत असतात. खामगाव येथे कपुरी पानासाठी मोठी बाजारपेठ असल्यामुळे मोठय़ा प्रमाणात उलाढाल होत असते. यापूर्वी अकोला, अमरावती व बुलडाणा जिल्हय़ात बारी समाजाचे नागवेली पानाचे पानमळे भरपूर होते; परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे दुष्काळ व पाणीटंचाईमुळे जिल्हय़ातील अनेक पानमळे नामशेष झाले. जिल्हय़ात सातपुड्याच्या कुशीत मध्य प्रदेशाच्या सीमाभागात तसेच अमरावती व जालना जिल्ह्यात तुरळक पानमळे शिल्लक आहेत; मात्र विड्याच्या पानांची बाहेर राज्यातून मोठय़ा प्रमाणात आयात होत असल्यामुळे पानांच्या किमतीत वाढ होत आहे.
देठगिणतीने पानांची मोजणी पूर्वीपासून चालत आलेली विड्याच्या पानाची मोजणी देठगिणतीने होते. प्रत्येक पेटार्या तील पानाची मोजणी ही देठगिणती पद्धतीने होते; परंतु गुटख्याच्या प्रकारामुळे पान खाण्याकडे युवा पिढीचा कल कमी आहे, तर सध्या देठगिणतीनुसार १00 कलकत्ता पट्टी पानासाठी ४00 ते ४५0 रुपये मोजावे लागत आहेत.