बुलडाणा: तालुक्यातील साखळी बु. गावापासून दीड किलोमिटर अंतरावर असलेल्या वाडी-वस्तीवर आतापर्यंत विद्युतची व्यवस्था नव्हती. साखळी बु. ग्रामपंचायतकडून एलईडी लाईट लावून नागरिकांना दिवाळीची अनोखी भेट देण्यात आली. वाडी-वस्तीवर एलईडीचा प्रकाश पोहचल्याने ग्रामस्थांच्या चेहºयावर आनंद दिसून आला. आजही अनेक भागात विद्युत दिवे लागत नसल्याने रात्रीला अंधाराचा सामना नागरिकांना करावा लागतो. तालुक्यातील साखळी बु. पासून जवळ असलेल्या पिराचा मळा व भोरकडे वाडी येथे सरपंच विजया अनिल कोळसे यांनी काही दिवसांपूर्वी भेट देवून वाडीवरील समस्या जाणून घेतल्या. दरम्यान, या परिसरात विद्युतची व्यवस्था नसल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दिसून आले. त्यानंतर सरपंच विजया कोळसे यांनी दिवाळीपर्यंत वाडी-वस्तीचा संपूर्ण परिसर प्रकाशमय करण्याचा संकल्प केला. ग्रामपंचायतच्या चौदाव्या वित्त आयोगातून व काही पैशांची जुळवा-जुळव करून पिराचा मळा व भोरकडे वाडी या भागात दिवाळीच्या मुहूर्तावर एल. ई. डी. लाईट लावले. सरपंच विजया कोळसे, माजी सरपंच सुरेश चौधरी, बंडू देशमुख यांनी लाईटचे उद्घाटन केले. यावेळी उपसरपंच गजानन जुमडे, रमेश वाघमारे, सुरेश भोरकडे, सुगदेव भागवत यांची प्रमुख उपस्थिती होती. दिलीप चौधरी यांनी परिसरात समस्या मांडल्या. वाडी वस्तीत लाईट लागल्याने नागरिकांना समाधान व्यक्त करून अलका भागवत यांनी यांनी सरपंच विजया कोळसे यांचा सत्कार केला.
कचरा उचलण्यासाठी घेणार ट्रॅक्टरचा आधारग्रामपंचायत स्तरावर स्वच्छतेच्या दिशेने पाऊल उचलण्यात येत आहेत. साखळी बु. ग्रामपंचायतने गावातील कचरा उलण्यासाठी घटांगाडी म्हणून व ग्रामपंचायतच्या इतर कामासाठी चौदाव्या वित्त आयोगातून ट्रॅक्टर खरेदी केला. ट्रॅक्टरच्या सहाय्याने संपुर्ण गावातील कचरा दररोज उचलण्यात येणार असून गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्यात येणार असल्याचे सरपंच विजया कोळसे यांनी सांगितले.