बुलडाणा - नांदुरा तालुक्यातील खातखेड शिवारात शेतात काम करण्याºया ४ शेकºयांवर १३ जुलै रोजी दुपारी ४ वाजेदरम्यान बिबट्याने अचानक हल्ला केला. यात चौघेही जखमी झाले. त्यांच्यावर नांदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे. नांदुरा येथून जवळच असलेल्या खातखेड शिवारात शेतात काम करणा-या सुपडा निंबाजी वानखडे रा. वडाळी (वय ३५) व दीपक होनाजी राजाने रा. खातखेड (वय ३०) या दोघांवर बिबट्याने हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले. यानंतर खातखेड गावाजवळ वासुदेव ओंकार बोंद्रे (वय ६०) व शिवसेना तालुकाप्रमुख संतोष डिवरे यांच्यावर सुध्द बिबट्याने हल्ला केला.दरम्यान याबाबतची माहिती मिळताच, विलास निंबोळकर, बबलु जुनगडे व ओमसाई फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी जखमींना उपचाराकरिता प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचाराकरीता अकोला येथे पाठविण्यात आले. दरम्यान हल्ला केल्यानंतर बिबट्या खातखेड परिसरातच दबा धरून बसल्याने परिसरातील नागरिक भीतीखाली वावरत आहेत. तर बिबट्याला पकडण्याकरिता कोणतेही आॅपरेशन संध्याकाळ पर्यंत राबविण्यात आले नाही.
बिबट्याचा शिवसेना तालुकाप्रमुखावर हल्ला, खातखेड शिवारातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 8:30 PM