लोकमत न्यूज नेटवर्कजानेफळ: कुटुंबासह शेतात राहणाऱ्या तुरणावर सात जून रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना मेहकर तालुक्यातील वडाळी येथे घडली. गेल्या तीन दिवसातील ही दुसरी घटना आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी वर्ग भयभीत झाला असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.वडाळी येथील दगडू पांडुरंग ढंगारे (२२) हे पत्नी, मुले व आई वडिलांसह शेतातच राहतात. शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास त्यांना गोठ्यातील बैलांचा ओरडण्याचा आवाज आला. त्यामुळे त्यांनी लगेच गोठ्यात धाव घेतली असता गोठ्यात शिरलेल्या बिबट्याने लगोलग त्यांच्या अंगावर झेप घेत त्यांच पाठीला चावा घेत त्यांना गंभीर जखमी केले. बिबट्याच्या नखांनी ते गंभीर जखमी झाले आहेत. रात्री वादळी पावसामुळे जखमी ढंगारे यांना उपचारासाठी अन्यत्र नेनेही शक्य नव्हते. त्यामुळे शनिवारी आठ जून रोजी त्यांना जानेफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलदीप अंभोरे यांनी त्यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना मेहकर येथे उपचारासाठी रेफर केले.गत दोन दिवसापूर्वीच बुधवारी पार्डी शिवारात बकºया चारण्यासाठी गेलेल्या मेहकर तालुक्यातीलच पार्डी येथील लक्ष्मण सहदेव शिंदे या १५ वर्षीय मुलावरही बिबट्याने हल्लाकरून त्याला जखमी केले होते. दोन मित्र मदतीला धावल्यामुळे तो बचावला व बिबट्याने तेथून धुम ठोकली होती. सध्या मान्सून पूर्व पावसाचे आगमन झाल्याने शेतात पेरणीपूर्व मशागतीची कामे जोमात सुरू झालेली असतांना बिबट्याने मात्र जानेफळ परिसरात दहशत पसरवली आहे. त्यामुळे शेतमजुरांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. प्रकरणी वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी ओरड होत आहे.
वडाळीत बिबट्याचा तरुणावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2019 2:15 PM