लोकमत न्यूज नेटवर्कजानेफळ : गावाला लागूनच असलेल्या मळी नामक शेत शिवारात बिबट्या व रोही हे दोन प्राणी १६ जुलै रोजी मृत अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर दोन्ही प्राणी वाहत्या नाल्याकाठी दाट झुडपात पडलेले असल्याने हा घातपात की शिकार? अशी जोरदार चर्चा संपूर्ण परिसरात होत आहे. याचा उलगडा करण्याचे आवाहन वनविभागासमोर उभे ठाकले आहे.जानेफळ गावाला लागूनच पुर्वेस मळी नामक शेत शिवार असून त्याला लागूनच वन विभागाची निंबा बिट आहे. तर गट क्र.१०५ मळी शिवारातील शाम मांगलाल गट्टाणी यांच्या मालकीच्या शेतातून एक मोठा पाण्याचा नाला गेलेला असून, त्याच्या काठावर एक बिबट्या व बाजुलाच रोही सुद्धा मृत अवस्थेत आढळून आला आहे. सदर पाण्याच्या नाल्यात मासे पकडण्यासाठी गेलेल्या काही लोकांना सदर दोन्ही प्राणी मृत अवस्थेत पडलेले दिसल्याने त्याची गेल्या २ ते ३ दिवसांपासून दबक्या आवाजात चर्चा सुरु होती. सदर चर्चा वनविभागाच्या काही कर्मचाऱ्यांनी तसेच शिवसेना शहर प्रमुख शिवाजी मुरडकर यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहविल्याने जिल्हा उपवनसंरक्ष भगत, वनपरिक्षेत्र अधिकारी एल.एम. पाटील, वनपाल एस.डी.परीहार आदींनी १६ जुलै २०१७ रोजी रात्री दरम्यान जानेफळ येथील मळी नामक शिवारातील शाम मांगीलाल गट्टाणी यांच्या शेतात धाव घेतली. त्यावेळी त्यांना कुजलेल्या अवस्थेत असलेला बिबट्या व रोही आढळून आले. त्यानंतर रात्रभर सर्च आॅपरेशन राबविण्यात येऊन १७ जुलै रोजी पशुवैद्यकीय अधिकारी डुघ्रेकर यांनी दोन्ही प्राण्यांचे शवविच्छेदन केले आहे. सदर घटनेतील बिबट्या व रोही हे कुजेपर्यंत वनविभागाला खबर नसल्याने तसेच सदर शेत मालकाने सुद्धा आपल्या शेतातील घटनेची माहिती वनविभागाला कळविली नसल्याने आश्चर्य व्यक्त होतआहे.याशिवारात सध्या रानडुकर, रोही हरीण, काळविट किंवा इतर काही जंगली प्राण्यांच्या शिकारीचा प्रकार वनविभागासाठी फारसा गंभीर राहिलेला नाही. त्यामुळे सर्रास या वन्य प्राण्यांच्या शिकारी सुरु आहेत. मात्र वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी याकडे डोळेझाक करीत असल्याने बिबट्या व रोही सारख्या प्राण्यांचे जिवन सुद्धा धोक्यात आल्याचे या घटनेवरुन स्पष्ट होते. सदर बिबट्या व रोही शेतातील झुडपात मृतावस्थेत पडलेले असल्याचे तसेच बिबट्याच्या पोटावर जळाल्याचा मोठा काळा डाग सुद्धा असलेला फोटो अनेकांच्या मोबाईलवर व्हायरल झाल्याची जोरदार चर्चा सूरु असून यावरुन सदर घटना ही घातपाताचा प्रकार असल्याचे बोलल्या जात आहे. त्यामुळे याचा छळा लावण्यासाठी वनविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती गठीत करुन सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. सदर घटने प्रकरणी वनविभागाकडून गुन्हा रिपोर्ट नं.५४६/१८ वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ कलम ९,३९ महाराष्ट्र वन नियमावली २०१४ चे नियम ९ (१) ड, ई नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास उपवनसंरक्षक भगत, यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी एल.एम.पाटी, वनपाल एस.डी.परिहार, पी.डी.सावळे, एस.डी.नागरे आदी करीत आहेत.