लोणार (बुलढाणा) : सरोवर परिसरात गत काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. लोणार सरोवर परिसरात दोन बछड्यांचे अनेकांना दर्शन झाले आहे. त्यामुळे, सराेवर पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
जगप्रसिद्ध असलेले लोणार सरोवर पाहण्यासाठी राज्यभरातील पर्यटक येतात. विविध स्पॉटवर बिबट्याचा वावर आहे. किन्ही रोड परिसरातील टॉवर क्रमांक एकपासून काही अंतरावर असलेल्या या मादी बिबट तीन बछड्यांसोबत खेळत असताना प्राणीमित्र सचिन कापुरे यांना आढळली. त्यांनी तो क्षण कॅमेराबद्ध केला. लोणार सरोवर परिसरात जंगल भ्रमंती करीत असताना पर्यटकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
पर्यटकांनी आपल्या सोबत काहीतरी मोठ्या आवाजाची शिट्टी वगैरे ठेवणे गरजेचे आहे. कारण एखाद्या वेळेस बिबट समोरा समोर जर आला तर आपण जोर जोरात आवाज करणे उड्या मारणे व न पळणे, पळाल्यामुळे बिबट आपल्या मागे येऊन आपल्यावर हल्ला करू शकतो. लोणारमध्ये बिबट्यांची संख्या वाढल्यामुळे पर्यटकांनी जंगल भ्रमण करतांना स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. आपल्या जवळ छत्री ठेवावी छत्री जोरात उघडल्याने बिबट घाबरून पळून जातो. जंगलात मुक्त पणे वावरणाऱ्या वन्य प्राण्यांना पाहणे आणि आपल्या कॅमेऱ्यामध्ये त्यांना टीपने हा अनुभव अविस्मरणीय आहे.