लोकमत न्यूज नेटवर्कनरवेल : उन्हाळ्याला सुरुवात झाली असून, कडक उन्ह तापत आहे. जंगलातील पाणीसाठे आटल्यामुळे वन्यप्राणी गावाकडे वळले असून, नरवेल येथे बिबट्याने पंधरा दिवसांत दोन पशू ठार केले आहेत. बिबट्याच्या वावरामुळे गावकरी भयभीत झाले आहेत.नरवेल येथे बिबट्याने पंधरा दिवसांपूर्वी वासराला ठार केले होते; परंतु ग्रामस्थांनी आरडाओरडा केल्यामुळे वासरू तिथेच सोडून बिबट पळून गेला होता. वनरक्षक यांनी नरवेल येथे भेट वासराची पाहणी करून बिबटने केलेल्या हल्ल्यात वासरू ठार झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान बिबट्याने परत गोठ्यामध्ये असलेल्या गुरांवर हल्ला केला. यावेळी सर्व ग्रामस्थांनी जागी होऊन नर्सरीमध्ये बॅटरीच्या साह्याने शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु बिबट आढळून आला नाही. वनरक्षक यांना गिरीश कोलते यांनी संपर्क करून माहिती दिली असता वनरक्षक तसेच त्यांची पूर्ण टिमने घटनास्थळी येऊन तीन पर्यंत गस्त घातली; परंतु बिबट्या निदर्शनास पडला नाही. पुन्हा तीन वाजताच्यादरम्यान शांतता झाल्यावर बिबट्याने बकरीच्या पिलावर हल्ला केला. त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच ग्रामस्थ आणि पशुधन मालक यामुळे चिंतेत सापडले आहे.
कठोरा भास्तन परीसरात बिबट्याचे दर्शन जलंब येथून जवळच असलेल्या कठोरा- भास्तन शिवारामध्ये एका इसमाला बिबट दिसल्याने परीसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कठोरा येथील रहीवाशी अनंता खवले ८ एप्रिल रोजी सायंकाळी भेंडवळवरून आपल्या दुचाकीने घराकडे परत येत असताना त्यांना कठोरा भास्तन शिवारात एका शेतामध्ये शेततळ्याजवळून एक बिबट जाताना दिसला. यामुळे परीसरातील नागरीक, शेतकरी, शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून एकच खळबळ उडाली आहे.