- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा: प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेणारी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (एनटीएस)साठी राज्यातील अर्ध्या टक्क्यापेक्षाही कमी विद्यार्थी पात्र ठरल्याचे वास्तव राज्य परीक्षा परिषदेने १ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता जाहीर केलेल्या निवड यादीने समोर आले आहे. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (एनटीएस) इयत्ता दहावीसाठी राज्यस्तर परीक्षेसाठी राज्यातून ८६ हजार २८१ विद्यार्थी नोंदविण्यात आले होते. त्यापैकी एनटीएस राष्ट्रीय परीक्षेसाठी राज्यातून अवघ्या ३८७ विद्यार्थ्यांचीच निवड करण्यात आली आहे. शालेय जीवनात अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाºया स्पर्धा परीक्षांमध्ये राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेला विशेष महत्त्व दिल्या जाते. ही परीक्षा इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते. या परीक्षेचा मुख्य उद्देश म्हणजे भारतातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना शिष्यवृत्ती देणे हा आहे. प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेणारी ही परीक्षा दोन स्तरावर घेतली जाते. पहिले राज्यस्तरीय प्रज्ञा शोध परीक्षा आणि त्यानंतर राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत ४ नोव्हेंबर २०१८ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पज्ञाशोध परीक्षा (एनटीएस) दहावीसाठी राज्यस्तर परीक्षेची निवड यादी व शाळानिहाय गुणयादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. एनटीएस इयत्ता दहावी परीक्षेसाठी राज्यातून ८६ हजार २८१ विद्यार्थी नोंदविण्यात आले होते. त्यापैकी एनटीएस राष्ट्रीय परीक्षेसाठी राज्यातून ३८७ विद्यार्थी एनसीईआरटी नवी दिल्ली यांच्याकडून निश्चित करण्यात आले आहेत. त्यामध्ये सर्वसाधारण गटातील १९६, ओबीसी संवर्गातील १०४, अनुसूचित जाती ५८, अनुसूचित जमाती २९ अशा एकूण ३८७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. संबंधीत संवर्गातील दिव्यांगासाठीचे चार टक्के आरक्षण देण्यात येत आहे. ज्या विद्यार्थ्यांची निवड जात किंवा दिव्यांग आरक्षणातून झालेली आहे त्यांना सदर प्रमाणपत्र एनसीईआरटी नवी दिल्ली यांना सादर केल्याशिवाय त्यांची निवड ग्राह्य धरली जाणार नसल्याचे राज्य परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे. राष्ट्रीयस्तर परीक्षा १२ मे रोजीराष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेच्या राज्यस्तरीय परीक्षेतून निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांची राष्ट्रीयस्तर परीक्षा ही १२ मे रोजी होणार आहे. त्यासाठी निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसºया आठवड्यात मिळणार असल्याची माहिती आहे. गतवर्षी एक हजार पैकी ९२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीगतवर्षी महाराष्ट्रातून राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत राष्ट्रीयस्तरावरील एक हजार विद्यार्थ्यांपैकी ९२ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झालेली आहे. या परीक्षेसाठी गुणपडताळणी केली जाणार नसल्याने काही विद्यार्थ्यांमध्ये मात्र नाराजी दिसून येत आहे.