भगवान वानखेडे । लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानांतर्गत टपाल खात्यात मुलींसाठी बचत खाते उघडण्यात येणार्या सुकन्या समृद्धी योजनेकडे खामगाव विभागात पालकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. मागील दहा महिन्यात केवळ १,0७३ पालकांनीच मुलीच्या नावे बचत खाते उघडल्याची माहिती पोस्टाच्या खामगाव येथील मुख्य कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे. यंदा ८.१ एवढा व्याजदर असूनही पालक आपल्या मुलींच्या नावे बचत खाते उघडण्यास अनास्था दाखवत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानांतर्गत सुकन्या समृद्ध योजनेंतर्गत मुलींच्या नावे पोस्टात बचत खाते उघडून तिच्या भविष्यासाठी निधी जमा करण्याची ही योजना आहे. मुलगी हे खाते वय वर्षे १८ अथवा २१ किंवा लग्न होईपर्यंत खाते सुरू ठेवू शकणार आहे. चालू आर्थिक वर्षात मुलींसाठी असलेल्या समृद्धी सुकन्या योजनेंतर्गत खात्यावर ८.१ टक्के दराने व्याज देण्यात येत आहे. समृद्धी सुकन्या योजना ही मुलींसाठीची विशेष ठेव योजना आहे. आर्थिक वर्ष २0१८-१८ या वर्षात समृद्धी सुकन्या खात्यात ठेव म्हणून ठेवल्या जाणार्या ठेवीवर ८.१ टक्के दराने व्याज दिले जाण्याची माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे समृद्धी सुकन्याद्वारे मुलींच्या उच्च शिक्षणाची आणि विवाहविषयक आर्थिक गरजा भागविता येणार आहेत. असे असतानाही मात्र खामगाव विभागातील १६ कार्यालयात दहा महिन्यात केवळ १ हजार ७३ पालकांनी खाते उघडले आहेत. यावरून या योजनेकडे पालकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
अशी आहे सुकन्या योजनामुलगी दहा वर्षांची होईपर्यंत तिचे आई-वडील समृद्धी सुकन्याचे खाते उघडू शकतात. एका मुलीचे एकच खाते उघडले जाऊ शकते. दोन मुली असतील, तर पालक प्रत्येकी एक याप्रमाणे दोन खाते उघडू शकतात. जुळ्या किंवा तिळ्या मुली असतील, तर त्या प्रमाणात एकाच वेळी दोन अथवा तीन खाती उघडता येऊ शकतात. ही खाती शक्यतो टपाल खात्यात अथवा सरकारकडून सांगण्यात आलेल्या सरकारी बँकांमध्येच उघडता येऊ शकतात. या योजनेंतर्गत खाते उघडण्यासाठी मुलीचे वय किमान दहा वर्ष असणे गरजेचे आहे. सध्या मुलीचे अकरा वर्षे असेल, तर चालू वर्षातच तिला खाते उघडता येईल. ही सवलत केवळ यावर्षीच उलब्ध आहे.
सुकन्या समृद्ध योजना ही मुलींच्या भविष्यासाठी लाभदायक अशी योजना आहे. या योजनेत खाते उघडून मुलीच्या भवितव्य उज्वल करावे. -सी.एल. गोसावी, पोस्ट मास्तर, खामगाव.