- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : साहित्यात कल्पनारम्य जगाचे चित्रण करण्यापेक्षा वास्तवाचे भेदक चित्रण करणे गरजेचे आहे. साहित्यिकांनी वास्तववादी लेखन करताना आपल्या साहित्यातून शोषित, पिडीतांच्या सुख-दु:खाचे हुंकार उमटू द्यावेत, असे नि:संदिग्ध प्रतिपादन प्रा. मधुकर वडोदे यांनी येथे केले.अंकुर साहित्य संघ व म.रा.साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने खामगाव येथील भूमिपुत्र स्व.भाऊसाहेब फुंडकर साहित्य नगरी (कोल्हटकर स्मारक मंदीर) येथे ५८ व्या दोन दिवसीय अखिल भारतीय अंकुर मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते संमेलनाध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी उद्घाटक म्हणून साहित्य व सांस्कृतिक मंडळाचे सदस्य आशुतोष अडोणी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्षा अनिता डवरे, साहित्यिक अशोक राणे, भाजप मिडीया सेलचे प्रदेश सदस्य सागर फुंडकर, ज्येष्ठ पत्रकार राजेश राजोरे, उर्मिलाताई गायकी, भगवानसिंह सोळंके, कविता वडोदे, रेखा शेगोकार, महादेवराव भोजने, केदार एकडे यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना वडोदे पुढे म्हणाले की, मनोरंजनाच्या हेतूने केलेले लेखन मागणीशी तडजोड करणारे व वास्तवापासून दूर असते. आपल्या कथा, कविता, कादंबरी आदी लेखनाच्या माध्यमातून व्यक्तिगत जीवनातील सुखदु:खे जाणून घेण्याची, व्यक्ती आणि समाज यातील संघर्षाचे चित्रण करण्याची प्रवृत्ती आढळली पाहिजे. वेगळ्या वाटा शोधणारे लेखन सद्यस्थितीत आवश्यक असल्याचे ते म्हणाले.प्रास्ताविक अरविंद भोंडे यांनी केले. संचालन सैय्यद अहमद, किर्ती बढे यांनी केले. आभार साहित्यिक रमेश डोंगरे यांनी मानले. सुरूवातीला स्वागताध्यक्ष आमदार आकाश फुंडकर यांच्या शुभसंदेशाचे वाचन किर्ती बढे- सांगळे यांनी केले. यावेळी महादेव बगाडे, अरूण भगत, रामेश्वर जोहरी, संदीप गावंडे, विनय वरणगावकर, शालीग्राम वाढे, प्रा. देवबा पाटील, अॅड. रजनी बावस्कार, किरण रेठेकर, सुरेश साबळे, सुरेश लोंढे, रघुनाथ खेर्डे, उर्मिला ठाकरे, आर.आर. होनाळे आदी साहित्यिकांची उपस्थिती होती.
विविध पुस्तकांचे प्रकाशनसाहित्य संमेलनाच्या अनुषंगाने साहित्य संमेलन विशेषांक शंब्दाकूरचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. तसेच ‘नसून अडचण असून खोळंबा’ या कथासंग्राहाचे आणि उद्वेग, कठिण सत्य, माउली आदी पुस्तकांचेही विमोचन यावेळी झाले. त्यानंतर अंकुर पुरस्कार २०१८ चे वितरण करण्यात आले.