धाड (जि. बुलडाणा), दि. २६ : गेल्या अनेक वर्षात गावपातळीवर असणार्या मूलभूत सुविधांचा अभाव आणि मुख्य असलेल्या रस्ते, स्वच्छ पाणी, सांडपाण्याच्या नाल्या, पथदिवे यासह शिक्षण, आरोग्य या विषयावर ग्रामपंचायतीस दरवर्षी मिळणारा तोकडा निधी, वर्षानुवर्षे गटातटाच्या राजकारणात गावविकासाला बसलेली खीळ, यातून गावाचा चेहरा-मोहरा बदलण्यास निघालेल्या धाड येथील सरपंच रिझवान सौदागर यांनी थेट देशातील तब्बल २४३ राज्यसभा खासदारांना पत्र लिहून धाड गावाच्या मूलभूत समस्या कायम निकाली काढण्यासाठी मदतीचे आवाहन केले आहे. प्रत्येकवेळी गावपातळीवर निवडणुका होतात. एक गट सत्तेत येतो आणि पाच वर्षे गटातटाच्या राजकारणात वेळ निघून जातो. त्यामुळे प्रत्येक गावात पिण्याचे पाणी, रस्ते, सांडपाण्याच्या नाल्या यासारख्या सोयी उपलब्ध दिसत नाही. परिणामी, घाणीचे साम्राज्य, आरोग्याचा प्रश्न सामाजिक वातावरण हे बिघडलेले राहते. आपल्या कार्यकाळात स्वच्छ पिण्याचे पाणी, चांगले रस्ते, सांडपाण्याची दज्रेदार व्यवस्था या बाबीवर लक्ष देऊन त्या सोडवण्याच्या हेतूने ग्रामपंचायत धाडच्यावतीने देशातील एकूण असणार्या २४३ राज्यसभा सदस्यांना आपल्या निधीपैकी काही निधी धाडसारख्या गावास देण्याच्या मागणीचे निवेदन पत्र त्यांनी वरील खासदारांना पाठविले आहे. बहुधा राज्यसभेवरील बहुतेक खासदार यांचा निधी पडूनच राहतो. ही बाब सरपंच रिझवान सौदागर यांनी हेरली, याचा उपयोग हा गावाच्या विकास कामासाठी होऊ शकतो. म्हणून त्यांनी इंटरनेटवरुन देशातील राज्यसभा सदस्यांची नावे, पत्ता, मो.नंबर, ई-मेल शोधून त्यांना निवेदन पत्र लिहिले. सोबत गावातील समस्या असणारी बोलकी छायाचित्रे पत्रासह जोडून प्रत्येक खासदारांना पाठविली आहेत. गावविकासाचा हेतू आणि ध्येय पाहता त्यांचा हा उपक्रम राज्यातून अभिनव असाच आहे. सध्या शासनाकडून ग्रा.पं.ला मिळणारा निधी आणि विषय हे रस्ते, पाणी, सांडपाणी हे वगळून असल्याने या समस्या सोडवणे कठीण असल्याचे मत त्यांनी बोलताना व्यक्त केले. यावेळी उपसरपंच दिलीप खांडवे, म.शफी, ऐहसान सेठ, सोहील सौदागर, मंगेश जाधव, प्रभाकर जाधव, शेख इमरान, रमेश सनान्से, लक्ष्मण बावणे, अकील सौदागर उपस्थित होते.
समस्या सोडविण्यासाठी २४३ खासदारांना पाठविले पत्र
By admin | Published: August 27, 2016 3:01 AM