बुलडाणा: दोन महिन्यानंतर लॉकडाउनमध्ये प्रतिबंधीत क्षेत्र वगळता जिल्ह्यात काही प्रमाणात शिथीलता देण्यात आली आहे. त्यामुळे २२ मे रोजी बुलडाणा शहरासह जिल्ह्यातील शहरी तथा ग्रामिण भागात जनजीवन सुरळीत होत असल्याचे चित्र दिसून आले. मात्र असे असले तरी रात्री सात ते सकाळी सात या कालावधीत जिल्ह्यात रात्री संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. शुक्रवारी बहुतांश ठिकाणी शारीरिक अंतर ठेवत आवश्यक वस्तुंची नागरिकांनी खरेदी केल्याने सकारात्मकरित्या नागरिक परिस्थितीशी जुळवून घेत आहे.आॅरेंज झोनमध्ये असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात तब्बल दोन महिन्यानंतर नवीन सवलती देण्यात आल्यामुळे प्रतिबंधित क्षेत्र वगळता जिल्ह्यातील जनजीवन सुरळीततेच्या दिशेने जात असल्याचे चित्र होते.दुकानांमध्ये दैनंदिन वस्तु खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली असली तरी अपवाद वगळता शारीरिक अंतर राखून नागरिक आवश्यक वस्तु खरेदी करताना दिसून आले. यामुळे हळूहळू का होईना अर्थचक्रही गतीमान होण्यास मदत मिळणार आहे.कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रतिबंधासाठी चवथ्या टप्प्यातील लॉकडाउन ३१ मेपर्यंत वाढविण्यात आले आहे. परंतू २२ मे पासून विविध नवीन सवलती लागू करण्यात आल्या आहेत. सर्व दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी पाच या वेळेत कंटेनमेन्ट झोन अर्थात प्रतिबंधीत क्षेत्र वगळता उघडी ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यानंतर शहरी भागातील जनजीवन सुरळीत सुरू झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. परंतू अद्याप कोरोनाचा धोका संपलेला नाही. त्यामुळे प्रत्येकजण आपली जबाबदारी म्हणून खबरदारी घेत आले. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून दुकानदारांनी ग्राहकांमध्ये निर्देशानुसार अंतर ठेवावे, एकावेळी पाचपेक्षा जास्त ग्राहकांना दुकानात घेवू नये, अशा सुचना जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी दिलेल्या आहेत. त्यानुसार काही दुकाने वगळता या सुचनांचे पालन करीत व्यवहार सुरळीत सुरू झाल्याचे २२ मे रोजी दिसून आले. गेल्या दोन महिन्यापासून दुकाने, बांधकामासह विविध उद्योग धंदे बंद असल्याने अर्थव्यवस्थेला मोठी खीळ बसली होती. परंतू आता नवीन सवलतीमुळे जिल्हास्तरावर अर्थव्यवस्था पुर्वपदावर येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
सलूनमध्ये नियमांचे पालनकेशकर्तनालयांवर अनेकांचा उदरनिर्वाह आहे. परंतू आतापर्यंत ही दुकाने बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. दरम्यान, केशकर्तनालये सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत सुरू ठेवण्यास परवागनी दिल्याने शुक्रवारी अनेक सलूनची दुकाने सुरू झाली होती. मार्गदर्शक सुचनांचेही येथे पालन होत होते.अनेक स्टाईल्सची कामे घेतलेली होती. परंतू लॉकडाउनमुळे ती करता आली नाही. आजपासून या कामांना सुरूवात झाल्याने मोठा आधार मिळाला आहे. या कामासोबतच आम्ही लॉकडाउनमधील सर्व नियमांचे पालन करून कोरोनाला हरवू.-सुभाष तायडे, स्टाईल्स कारागीर.कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यापासून सर्व कामे ठप्प होती. अनेकांच्या आॅर्डर आलेल्या होत्या, परंतू त्या पूर्ण करू शकलो नाही. आता कामांना परवानगी मिळाली असल्याने आर्थिक हातभार लागणार आहे. परंतू सर्वांनी फजिकल डिस्टन्सिंग पाळत ही कामे करावी.- योगेंद्र गुळवे, पेंटर, बुलडाणा.