- ब्रह्मानंद जाधव बुलडाणा : फुलपाखरे आणि फुले यांचा संबंध हा अगदी जवळचा आहे. विशिष्ट फुलपाखरे हे काही ठरावीक फुलांवरच दिसून येतात. फुलांमुळे फुलपाखरांचे जीवन सुंदर बनले आहे. परंतू अलीकडील काळात फुलपाखरांच्या अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. फुलपाखरांचे चांगले आयुष्य वाढत्या प्रदुषणाने बेरंग होत असल्याची खंत किटक अभ्यासक प्रा. अलोक शेवडे यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
आपल्याकडे फुलपाखरांच्या किती प्रजाती आहेत?ढोबळमानाने बुलडाणा जिल्ह्यातील जंगल परिसरात ६८ च्या आसपास फुलपाखरांच्या प्रजाती आढळून येतात. परंत त्याच्याही संख्येत लक्षणीय घट झालेली दिसून येते.
तुम्ही आतापर्यंत किती प्रकारच्या आणि कोणत्या किटकांची नोंद घेतली?छायाचित्रणाच्या माध्यमातून मी आजपर्यंत ३२५ च्या आसपास कीटक प्रजातींची नोंद घेतली आहे. त्यामध्ये आऊल फ्लाय, मोनार्क बटरफ्लाय, अश्वमुखी बीटल, रेन्बो ग्रॉसहॉपर, सिग्नेचर स्पायडर यासह अनेक दूर्मिळ फुलपाखरांचाही समावेश आहे.
हे कीटक दुर्मीळ होण्याची कारणे कोणती?बुलडाणा हे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. पंरतू मागील दशकापासून बुलडाण्याच्या तापमानात लक्षणीय वाढ झालेली जाणवते. बुलडाणा परिसरात बांधकाम, खोदकाम यामध्येही वाढ झालेली आहे. याचा परिणाम कीटकांच्या अधिवासावर झालेला दिसतो. २०१० पर्यंत दिसणारी विशिष्ट प्रकारची झाडे-झुडपे, गवत, फुले त्यानंतरच्या काळात बुलडाणा परिसरातून नाहीशी होत असल्याचे चित्र आहे.
कोणत्या प्रजाती कमी झाल्या आहेत?रेनबो ब्ल्यू ग्रासहॉपर हे केवळ रुईच्याच झाडांवर जगणारे असून, जुलै ते आॅक्टोबर याच कालावधीत आढळते. इंद्रधनुष्याप्रमाणे आकर्षक रंग असणारी ही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. यासह जंगलातील इतरही अनेक प्रजाती कमी झाल्या आहेत.
कीटकनाशकांचा कीटकांच्या प्रजातीवर काय परिणाम जाणवतो?मानवी अन्नधान्याची समस्या सोडविण्यासाठी अपण शेती विस्तार करीत आहोत. गावालगतची शेतजमीन घर बांधकामाखाली येत आहे. त्यामुळे विस्तारीत शेतजमीनीचे जंगल पट्ट्टयावर अतिक्रमण होत आहे. साहजिकच या जंगल पट्ट्टयातील कृमी- कीटक व इरत वन्यजीव यांचा शेतजमीनीवर वावर दिसत आहे. पिकांच्या व्यवस्थापनासाठी वापरली जाणारी विषारी कीटकनाशके कृमी-कीटकांसाठी प्राणघातक ठरत आहे. परिणामत: उपरोक्त सर्व वन्यजीवांचा अधिवास व अस्तित्त्व धोक्यात आले आहे. वाढत्या प्रदुषणामुळे फुलपाखरांच्या दुर्मीळ प्रजाती दिसेनास्या झाल्या आहेत. फुलपाखरांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.मानवी स्वार्थाची पुर्तता करण्यासाठी चाललेली आपली उलाढाल जरा नियंत्रणात ठेवण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून या सृष्टीतील इतर जीवांनाही आपआपल्या वैशिष्ट्याप्रमाणे जगता येईल व ही सृष्टी सदैव सुंदर राहिल. फुलपाखरांच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.