बुधवारी सकाळी धाड ते सावळी रस्त्यावर ऐन रस्त्यावर एक घुबड पडून असल्याची माहिती नीलेश गुजर यांना मिळाली. घटनास्थळी त्यांनी जाऊन त्या घुबडाला पाणी पाजले. त्यास मुक्त केल्यानंतर घुबडाला उडता येणे शक्य नसल्याचे नीलेश गुजर यांच्या लक्षात आले. त्यांनी या भागातील वनरक्षक विनोद मुळे यांना पाचारण केले.
त्यावेळी सदर घुबड हे अत्यंत दुर्मीळ प्रजातीचे असल्याचे समतले. अधिवासानुसार घुबडांचे प्रकार बदलत असतात आणि भारतात आढळणारे रक्तलोचन आणि वनपिंगळा या दोन प्रकारचे घुबड महाराष्ट्रात अत्यंत कमी प्रमाणात आहेत. या ठिकाणी जखमी अवस्थेत सावळी रोडवर रक्तलोचन प्रजातीचे घुबड मिळून आल्यानंतर या घटनेची एकच चर्चा परिसरात सुरू आहे. सध्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे कडक निर्बंध लागू असल्याने सर्वत्र शुकशुकाट आहे. जंगलात पक्ष्यांना व प्राण्यांना पिण्याचे पाणी मिळत नसल्यामुळे ते मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. दोन दिवस अगोदर या भागात एक कोल्हा पाण्याच्या शोधत आला होता. मात्र मोकाट श्वानांनी हल्ला करून त्यास ठार केले. असेच अनेक वन्यजीव गावशिवारात भटकंती करताना शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले आहेत. एका दुर्मीळ जातीच्या घुबडाला प्राणिमित्र नीलेश गुजर यांनी वनरक्षक विनोद मुळे यांच्या ताब्यात देऊन त्यास जीवदान दिले आहे.