मलकापूर (बुलढाणा) : उधारीचे १० रूपये दिले नाही म्हणून पेट्रोल टाकून जाळून हत्या केल्या प्रकरणी येथील वि. तदर्थ तथा अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एस. व्ही. जाधव यांनी ६ सप्टेंबर रोजी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली. काशीराम राजाराम उगले देवधाबा येथील आरोपी अशोक गणपत भिसे याच्याकडे ५ सप्टेंबर २०२० रोजी रात्री ९ वाजताच्या दरम्यान दारू पिण्याकरीता गेले होते. आरोपी अशोक भिसे याने उधारीचे १० रूपये मागितले. त्यावर काशीराम याने पैसे नंतर देण्याचे सांगत दारू मागितली. त्यावेळेस आरोपीने काशीरामच्या अंगावर पेट्रोल टाकून लाग लावली. काशिरामच्या मृत्युपूर्व जबानीवरून आरोपी विरुध्द पो.स्टे. मलकापूर ग्रामीण येथे कलम ३०७ नुसार दाखल करण्यात आला.
उपचारादरम्यान काशीराम उगले यांचा मृत्यु झाल्याने या प्रकरणात कलम ३०२ नुसार वाढीव कलम दाखल करून आरोपी विरूध्द खुनाचा खटलाबाबत दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. सरकार पक्षातर्फे १० साक्षीदार तापसण्यात आले. डॉक्टर, प्राथमिक तपास अधिकारी नामदेव तायडे तसेच मृताची आई व इतर साक्षीदार यांची साक्ष महत्वाची ठरली. सरकार पक्षातर्फे सहा. सरकारी अभियोक्ता शैलेश हरीहर जोशी यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून आरोपी अशोक गणपत भिसे यास जन्मठेपेची शिक्षा तसेच ५००० रूपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. प्रकरणात प्राथमिक तपासी अधिकारी म्हणून पी. एस. आय नामदेव तायडे व तपास अधिकारी अनिल बेहरानी, पैरवी अधिकारी सुभाष साळुंके यांनी काम पाहिले.