बुलडाणा : गत सहा दिवसांत पेट्रोलच्या दरात ८९ पैसे आणि डिझेलच्या दरात १.२३ पैशांची वाढ झाली आहे. ज्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट ढासळत आहे. गत वर्षभरात पेट्रोल आणि इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. कोरोना काळात वीज बिलासोबतच इंधनाचेही दर वाढलेत. सोबतच गृहोपयोगी वस्तूही चढ्या भावाने ग्राहकांना खरेदी कराव्या लागताहेत. त्यामुळे सर्वसामान्यांसमोर आर्थिक पेच निर्माण झाल्याचे दिसून येते.
महागाईत सातत्याने वाढ हाेत असताना ११ मे रोजी पेट्रोलची किंमत ९८.३१ रुपये आहे तर डिझेलची किंमत ८८.३३ रुपये आहे. ५ मे रोजी समान किंमत ९७.२४ रुपये आणि डिझेल ८७.१० रुपये होते. पेट्रोलियम कंपन्यांनी पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पाँडीचेरीमधील निवडणुका संपल्यानंतर इंधनाचे दर २४ पैशांनी आणि डिझेलमध्ये २८ पैशांची वाढ केली आहे.
सुमारे दोन महिन्यांनंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले. यापूर्वी २७ फेब्रुवारीला पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये किंचित वाढ करण्यात आली होती. गेल्या दोन महिन्यांत पेट्रोलच्या किमती पुन्हा वाढल्या आहेत. म्हणूनच, सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याची मागणी केली आहे, तर सर्वसाधारण ग्राहकांच्या निवडणुकांसाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतील घट किंवा स्थिरीकरण हे निवडणुकांच्या किमती आणि किमतींनंतरच्या वाढीशी जोडले गेले आहेत.पेट्रोल आणि डिझेल ग्राहक आता अप्रत्यक्षपणे सरकारवर इंधनाचे दर नियंत्रित करत असल्याचा आरोप करीत आहेत. निवडणुका होण्यापूर्वी पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमती कमी करण्याचा उद्देश महागाईपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविणे हेच यात शंका आहे. किमती नियंत्रणाबाहेर असूनही बाजारात तेलाच्या किमती कमी झाल्याचा ग्राहकांना फायदा होत नाही.
पेट्रोल, डिझेल सोबतच गॅसच्या दरातही वाढ
कोरोना काळात अनेक कारखाने बंद आहेत. त्यामुळे अनेकांचा रोजगार हिरावला गेला आहे. बेरोजगारी वाढत असतानाच, महागाईतही सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोल, डिझेल सोबतच गॅसच्या दरातही वाढ होत आहे. आवक कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थिती ऐन कोरोना काळात निर्माण झाली आहे. त्यामुळे सामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. शासनाकडून कोणतीही उपाययोजना केली जात नाही.
- विजय क्षीरसागर, बुलडाणा
पेट्रोलच्या दरवाढीमुळे महागाईमध्ये सातत्याने वाढ होत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. पेट्रोल दरवाढ सामान्यांना परवडणारी नाही. त्यामुळे पुन्हा सायकलचा वापर करावा लागणार की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सामान्यांसोबतच गरिबांनाही पेट्रोल आणि डिझेल दरवाढीची झळ सोसावी लागत आहे.
- राजेंद्र इंगळे, बुलडाणा
कोरोनामुळे अनेकांच्या उत्पन्नात घट झाली आहे. कोरोना उपाययोजनेंतर्गत दुसरा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये गत सहा दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. सातत्याने वाढणारी महागाई सर्वसामान्यांना दुहेरी झटका देणारी ठरत आहे. कोरोनाचे नैसर्गिक संकट कायम असतानाच, शासनाकडून सातत्याने महागाईत भर घातली जात आहे. लॉकडाऊन सुरू असल्याने सामान्यांना आवाजही उठविता येत नाही. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे. महागाईस शासन जबाबदार आहेे.
- संदेश जाेशी, बुलडाणा
तेलाच्या किमतीपेक्षा कर जास्त
तेलाच्या किमतीपेक्षा देशात कर अधिक असल्याचे दिसून येतेे. तेलाचे दर २९.७ रुपये आहेत. यावर केंद्र शासनाकडून ३३ रुपये तर राज्य शासनाकडून २६.२ रुपये अधिभार घेतला जात आहे. सोबतच पेट्रोलच्या दरात ३.६९ डीलर कमिशन समाविष्ट आहे तर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर यासारख्या मोठ्या शहरांमध्ये ०.२ व्हॅट लागू आहे. त्यामुळे महाराष्ट्रात तेलाच्या किमतीपेक्षा टॅक्स जास्त असल्याचे दिसून येते. तेलाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सामान्य ऐन कोरोनाकाळात मेटाकुटीस आले आहेत.