ना.यशोमती ठाकूर २३ जानेवारी रोजी चिखली दौऱ्यावर असताना आ.श्वेता महालेंनी त्यांची भेट घेऊन आपल्या मागणीचे पत्र दिले. या पत्रात मूलभूत सुविधा २५१५, १२३८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत व इतर अनेक शासकीय योजनेमधून विविध तालुक्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची विकास कामे मंजूर झालेली आहेत. अनेक कामांचे कार्यारंभ आदेश दिलेले आहेत, काही कामांचे आदेश देणे बाकी तर काही कामांची निविदा प्रक्रिया करणे बाकी असताना सरकारने सर्वच कामांना स्थिगिती दिल्याने कोट्यवधी रुपयांची विकास कामे ठप्प पडलेली आहे. अनेक कामांवर अंदाजपत्रके, निविदा आणि इतर सर्व कागदोपत्री कामे पूर्ण झालेली असून त्यावर शासनाचा बराच निधी खर्चही झालेला आहे. या पृष्ठभूमीवर ना.यशोमती ठाकूर यांनी विदर्भातील सरकारचे प्रतिनिधित्व तसेच बुलडाणा जिल्ह्याच्या संपर्कमंत्री या नात्याने पुढाकार घ्यावा. जिल्हा आणि विदर्भातील विकास कामासाठी आलेला निधी परत जात असल्यास तो विदर्भावर आणि बुलडाणा जिल्ह्यावर अन्याय ठरणारा असल्याने याप्रकरणी जातीने लक्ष घालून संबंधित विकास कामांवरील स्थगिती हटवावी, अशी आग्रही मागणी आ.महालेंनी केली आहे. यावेळी भाजपा शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख अनिस, न.प.गटनेते प्रा.डॉ.राजू गवई, तालुकाध्यक्ष डॉ.कृष्णकुमार सपकाळ, अनमोल ढोरे, बद्री पानगोळे, सुरेश इंगळे, रमेश आकाळ आदी उपस्थित होते.
विविध कामांवरील स्थगिती उठवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 4:35 AM