- योगेश देऊळकार लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्र विभागाकडून नेत्रदानाबाबत जनजागृती करण्यात येते. या जनजागृतीचा सकारात्मक परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. अंध व्यक्तींना आधार देण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. गेल्या सव्वा वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यातील ३० व्यक्तींनी मरणोत्तर नेत्रदानातून अंधारलेल्या आयुष्यात प्रकाश आणण्याचा प्रयत्न केला आहे.जिल्हा सामान्य रुग्लायातील नेत्र विभागात कार्यरत नेत्रदान समुपदेशकांच्या वतीने उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह जिल्हाभरात नेत्रदानाबाबत जनजागृती करून त्यांना मरणोत्तर नेत्रदानासाठी प्रोत्साहित करण्यात येते. या माध्यमातून दिवसेंदिवस नेत्रदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक समोर येत असल्याचे दिसून येत आहे. सर्वसामान्यांमध्ये असलेल्या अंधश्रद्धेमुळे नेत्रदान करण्यासाठी कोणीही समोर येत नव्हते. मृत्यूनंतर आपण नेत्रदान केल्यास स्वर्गात गेल्यावर आपण आंधळे होतो, असा अनेकांचा गैरसमज आहे. नेत्रदानाबाबत असलेले सर्व गैरसमज दूर करून लोकांना नेत्रदानासाठी प्रोत्साहित करण्याचे काम नेत्र विभागाकडून युद्ध पातळीवर करण्यात येत आहे. जिल्ह्यात २०१९ ते आतापर्यंत अशा सव्वा वर्षाच्या कालावधील एकुण ३० व्यक्तींनी मरणोत्तर नेत्रदान केले. तालुकास्तरावर ग्रामीण रुग्णालयांमध्ये नेत्रदान संकल्प पत्र देण्यात आले आहेत. याठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने संकल्पपत्र भरून देत आहेत. यासाठी समुदेशकांकडून जनजागृती करण्याचे काम सुरू आहे. ग्रामीण भागामध्ये विविध शिबिरांचे आयोजन करून ग्रामस्थांना याविषयी सविस्तर माहिती देण्यात येते. आपल्या मृत्यूनंतर आपण नेत्रदान केल्यास आपल्या डोळ्यांनी अंध व्यक्तीच्या माध्यमातून मृत्यूनंतरही आपण हे जग पाहू शकतो, ही बाबत सर्व सामान्यांच्या मनावर रुजविली जाते. परिणामी नेत्रदानाचा टक्का वाढत असल्याचे आशादायी चित्र सध्या निर्माण झाले आहे.
अंधारलेल्या आयुष्यात नेत्रदानाचा प्रकाश!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2020 2:09 PM