खामगाव: येथून जवळच असलेल्या अंबिकापूर शिवारातील एका शेतात वीज पडल्यानंतर लागलेल्या आगीत दीडशे िक्वंटल कांद्यासह, पॉवर ट्रिलर ट्रॅक्टर आणि ठिंबक सिंचन साहित्यासह शेती साहित्य जळून खाक झाले. ही घटना सोमवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे शेतकर्याचे जवळपास दहा लाख रूपयांचे नुकसान झाल्याची चर्चा आहे.
प्राप्त माहितीनुसार,खामगाव तालुक्यात सोमवारी सायंकाळी वादळी वार्यासह जोरदार पाऊस झाला. यावेळी अंबिकापूर शेत शिवारातील किसन अश्रुजी हिवराळे रा. चितोडा यांच्या शेतात वीज कोसळली. वीज कोसळल्यानंतर लागलेल्या आगीत कांदा चाळीतील सुमारे दीडशे क्विंटल कांदा, पाच क्विंटल ज्वारी, पॉवर ट्रिलर टॅक्टर, ठिंबक सिंचन, १५० प्लास्टिक पाइप, पेरणी यंत्रासह इतर आठ ते दहा लाखांचे साहित्य जळून खाक झाले. या घटनेमुळे शेतकर्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत. त्याचवेळी काही ठिकाणी जनावरे मृत्युमुखी पडल्याचे वृत्त आहे.