चिखली : गांगलगाव येथील महिलांनी गावात अवैधरित्या दारू विक्रेत्यांविरुद्ध एल्गार पुकारत ७ सप्टेंबर रोजी त्यांच्याकडील अवैध दारूचा साठा जप्त केला व अंढेरा पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्याचा आक्रमक पवित्रा घेतला. या कामी जवळपास ४५ महिला व नागरिकांनी दारूविक्रेत्यांवर कारवाईसाठी अंढेरा पोलिसांना भाग पाडले. हिरकणी महिला ग्रुपच्या या सदस्यांचा आक्रमक पवित्रा पाहता ठाणेदार नाईकवाडे यांनी पाच अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध तक्रार दाखल करून घेत यापैकी पूर्वी गुन्हय़ाची नोंद असलेल्या आरोपींना तडीपार करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे दाखल करण्याचे आश्वासन दिले. गांगलगाव येथे वंदना घुगे, संगीता फुल्लारे, प्रकाश खरात, तात्याबा खरात व ज्योती उद्धव म्हस्के हे अवैध देशी दारू विकतात. ७ सप्टेंबर रोजी महिलांनी दारू विक्रेत्यांच्या घरी जाऊन दारू ताब्यात घेतली व पोलिसांना बोलावले. पोलिसांनी अवैध दारू विकणार्यांना ताब्यात घेतले, तर इतर तीन आरोपी फरार झाले. या प्रकरणानंतर हिरकणी महिला ग्रुपच्या अध्यक्षा मंदाबाई देवेंद्र आराख, तंटामुक्ती अध्यक्ष गोविंदराव म्हस्के, सरपंच बबनराव म्हस्के, पोलिस पाटील भगवानराव सावळे, माजी सरपंच मदनराव म्हस्के, अशा प्रमुख कार्यकर्त्यासह ५0 ते ६९ महिला अंढेरा पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदविली. अंढेरा पोलिस स्टेशनमध्ये हा सर्व प्रकार सुरू असताना हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा वृषालीताई बोन्द्रे यांनी दूरध्वनीवरून ठाणेदारांशी संपर्क साधून दारूबंदीसाठी सरसावलेल्या महिलांना सहकार्य करण्याचा आग्रह धरला. यावेळी चंद्रकला आराख, सविता आराख, शोभा आराख, उषा आराख, कौशल्याबाई आराख, अलका बोर्डे, मिनाबाई आराख, दुर्गा बोर्डे, कमलबाई आराख, आशा आराख आदींसह सुमारे ४५ महिला व ग्रामस्थ उपस्थित होते..
दारू विक्रेत्यांना केले पोलिसांच्या हवाली
By admin | Published: September 09, 2014 7:02 PM