अनिल गवई
खामगाव : साहित्यिक समाजात जसा जगतो, जसा वावरतो. त्याचेच चित्रण त्याच्या साहित्यात उतरते आणि म्हणूनच वेदना आणि दु:ख साहित्यातून उजागर होते. दु:ख उजागर करण्यासाठी साहित्यासारखे दुसरे प्रभावी माध्यम नाही, असे आपले प्रामाणिक मत असल्याची कबुली ज्येष्ठ साहित्यिक तथा ‘फेसाटी’कार नवनाथ गोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. आधुनिक युगात ‘एडीट आणि डीलीट’चा प्रभाव जाणवत असला तरी साहित्याला कोणत्याही युगात ‘तोड’ नाही. ‘जुनं ते सोनं’ या उक्तीप्रमाणे साहित्य हे अजरामर असल्याचे ते म्हणाले.तिसऱ्या राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनासाठी ते खामगावात आले असता त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.
प्रश्न : साहित्यक्षेत्राच्या वाटचालीबद्दल काय सांगाल ?
- पदव्युत्तर शिक्षण घेत असताना, काही साहित्यिकांशी गाठ पडली. त्यांच्या सोबतीमुळे साहित्याची गोडी लागली. जगण्याने बरेच काही शिकता आले. अनुभवाचा साठाही साहित्यक्षेत्रात कामी आला असला तरी आपल्या साहित्य क्षेत्रातील वाटचालीत विष्णू पावले, विनोद कापसे, आणि आप्पा बुडके हे मैलाचे दगड ठरले. मित्रांच्या सहकार्यांमुळेच आपली साहित्य क्षेत्रातील वाटचाल सुरू झाली.
प्रश्न : साहित्य क्षेत्रातील पहिली कलाकृती कधी उदयास आली ?
- पदव्युत्तर शिक्षण घेत असतानाच, मित्रांशी साहित्यासंबधीत गप्पा रंगायच्या. मिळेल ते वाचायचो. त्यामुळे वाचनाची आणि लेखनाची गोडी लागली. यातूनच ‘काळ’नावाची पहिली कथा उदयास आली. ती प्रकाशीत झाल्यानंतर आत्मविश्वास गगनाला भिडला. कालातंराने ‘सुबंरान’या आख्यानरुपात मांडायच्या कांदबरीचे रूप सापडले. अशा पध्दतीने आपल्यातील साहित्यकाचा प्रवास सुरू झाला.
प्रश्न : साहित्य क्षेत्रात कुणा-कुणाचे पाठबळ मिळाले?
- अतिशय प्रतिकुल परिस्थितीतून आपली साहित्यिक वाटचाल राहीली आहे. शिक्षणासाठीच संघर्ष करावा लागल्याने, ‘फेसाटी’ची निर्मिती होण्यापूर्वी आपण फार साहित्य वाचले असे म्हणता येणार नाही. आयुष्यात जे जगत आलो आणि जगत आहे. त्याचीच मांडणी साहित्यात केली. साहित्य क्षेत्रात शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. रणधीर शिंदे आपले प्रेरणास्त्रोत आहेत. समिक्षक डॉ. राहुल अशोक पाटील, आनंद विंगकर, डॉ. आशुतोष पाटील, उमेश मोहिते, डॉ. राजन गवस, डॉ. नंदकुमार मोरे आणि डॉ. दत्ता घोलप यांचे योगदान विसरता येणार नाही.
प्रश्न : साहित्य क्षेत्रात आपणाला आनंद देणारी बाब कोणती ? - आपल्या सारख्या सामान्य साहित्यिकाला युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त होणं ही बाब आनंददायी तितकीच धक्कादायक होती. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सलग सात दिवस मोबाईल खणखणत होता.साहित्य अकादमी पुरस्कारामुळेच प्रकाशझोतात आलो. तसेच बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात ‘फेसाटी’ ही कादंबरी समाविष्ट झाल्याचेही समाधान असून, ज्येष्ठ साहित्यिक रा.रं.बोराडे यांनी शुभेच्छांसोबतच पोटापाण्याचाही प्रश्न मिटविला. त्यांच्या प्रयत्नांमुळेच सद्यस्थितीत लोणी येथील पद्मभूषण विखे पाटील महाविद्यालयाच्या अभ्यास मंडळावर समन्वयक म्हणून कार्यरत आहे. त्यांनीच विखे पाटलांशी बोलून आपल्या उपजिविकेचा प्रश्न मिटविला.
प्रश्न : युवा पिढीसाठी आपला संदेश काय ?
- आयुष्यात चढ-उतार कुणालाही चुकले नाहीत. तुम्ही प्रारंब्ध बदलवू शकत नाही. त्यामुळे आहे त्यात सुख मानत, जीवन क्रमत रहा. कोणतंही काम लहान आणि मोठं ठरत नाही. हा अनुभव आपल्या आयुष्यात घेतला आहे. आहे त्या कामाशी प्रामाणिक रहा. चालढकल वृत्तीने कुणाचेही भलं झालं नाही. त्यामुळे ‘कल करे सो आज, आज करे सो अभी’ एवढाच संदेश आपला ‘लोकमत’च्या माध्यमातून युवा पिढीला राहील.