पिंपळगाव राजा : भरधाव मेटाडोअरने दिलेल्या धडकेत दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना ९ मार्च रोजी घडली.पिंपळगाव राजा येथे पेठपुरा भागात शनिवारी सकाळी सुमारे १० वाजता मेटाडोअर क्रमांक एम.एच.०४ -६८९० या वाहनाने कृष्णाली अमोल तिवारी या दीड वर्षीय चिमुकलीला जोरदार धडक दिली. यात तीच्या डोक्याला जबर मार लागल्याने ती गंभीर जखमी झाली. अशा अवस्थेत चिमुकलीला सर्वप्रथम खामगाव येथील सिल्व्हरसिटी हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले. परंतु तिची प्रकृती अत्यवस्थ असल्याने पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले. अकोला येथे नेत असतना वाटेतच चिमुकलीचा अंत झाला. यानंतर खामगाव येथील सामान्य रूग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर तीच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी मुकुंद रमेश भगत रा.भालेगाव बाजार यांनी पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून वाहनचालक अब्दुल साजिद शेख मुराद (वय ३९ वर्षे) याच्या विरूध्द भादविच्या कलम २७९, ३०४ अ नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास ठाणेदार प्रशांत कावरे, यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक बोरसे करीत आहेत. या दुर्देवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.(वार्ताहर)
पित्याची ती भेट ठरली शेवटची!मृत्यू झालेल्या कृष्णाली या दीड वर्षीय चिमुकलीचे वडील अमोल तिवारी हे गावात काम नसल्याने रोजगाराच्या शोधात चेन्नई येथे गेले आहेत. जागतिक महिला दिनी अर्थात ८ मार्च रोजीच ते चेन्नई येथे रवाना झाले. अशात दुसºयाच दिवशी मुलीच्या मृत्यूची वार्ता त्यांच्या कानावर पडली. यामुळे अमोल तिवारी यांना धक्काच बसला. अतिशय दुर्देवी या घटनेमुळे परिसरात दु:खद छाया पसरली आहे. वडीलांनी आपल्या चिमुकलीची ८ मार्चला घेतलेली भेट ही शेवटची भेट ठरली आहे.