चिखली : स्थानिक न.प़ प्रशासनाद्वारे शहरातील मध्यवस्तीत असणाऱ्या स्व.राजाभाऊ बोंद्रे हायस्कूलमध्ये आमदार श्वेता महाले यांच्या आधार बहुउद्देशीय संस्थेद्वारा ५० खाटांचे कोविड रुग्णालय उभारण्यात येत असून, त्याची तयारीदेखील सुरू करण्यात आली आहे़ मात्र नागरी वस्तीमध्ये हे रुग्णालय उभारू नये, अशी भूमिका परिसरातील नागरिकांनी घेतली असून, तशा आशयाचे निवेदन ४ मे रोजी नागरिकांनी मुख्याधिकारी नगर परिषद यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, स्व.राजाभाऊ बोंद्रे हायस्कूल परिसरात सर्व बाजूंनी दाट लोकवस्ती आहे. तसेच परिसरातील लहान मुले व वयोवृद्ध माणसे या शाळेच्या परिसरात खेळण्यासाठी व फिरण्यासाठी सकाळ-संध्याकाळ येत असतात. या ठिकाणी काेविड रुग्णालय सुरू झाल्यास कोरोना संसर्ग होण्याचा धोका आहे़ त्यामुळे सदर कोविड रुग्णालय या ठिकाणी सुरू करण्यास परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे़ या ठिकाणी कोविड रुग्णालय सुरू झाल्यानंतर परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला न.प़ प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही देण्यात आला आहे. निवेदनावर परिसरातील नागरिकांची स्वाक्षरी आहे़ निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी व इतरांनाही देण्यात आल्या आहेत़