सोमवारी जिल्हाधिकारी एस. रामास्वामी यांनी बुलडाणा, चिखली, देऊळगाव राजा, खामगाव, मलकापूर हे पालिका क्षेत्र प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित केले होते. मंगळवारी मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, शेगाव, जळगाव जामोद, नांदुरा, मोताळा आणि संग्रामपूर पालिका क्षेत्राला प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियमांसह अन्य कायद्याचा आधार घेत जिल्हाधिकारी यांनी हे आदेश दिले आहे. या प्रतिबंधित क्षेत्रात २३ फेब्रुवारीच्या सायंकाळी ६ वाजल्यापासून ते एक मार्चच्या सकाळी ८ वाजेपर्यंत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. जिल्ह्यात यापूर्वीच जमावबंदीचा आदेश जिल्हाधिकारी यांनी लागू केलेला आहे. प्रतिबंधित क्षेत्रात रात्री ८:३० ते दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे.
प्रतिबंधित क्षेत्र वगळून सर्व प्रकारचे बाजार, बाजारपेठ क्षेत्रातील दुकाने ही सोमवार ते शुक्रवार नियमितपणे सकाळी ९ ते ५ या कालावधीत सुरू राहतील. आठवड्या अखेर शुक्रवारी सायंकाळी पाच ते सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत असलेल्या संचारबंदीच्या वेळी ही दुकाने बंद राहतील.
--पूर्वनियोजित परीक्षा वेळेनुसारच--
जमावबंदीच्या कालावधीत संपन्न होणाऱ्या पूर्वनियोजित परीक्षा त्यांच्या वेळापत्रकानुसारच होणार आहे. मात्र यादरम्यान परीक्षार्थींना त्यांचे परीक्षेचे ओळखपत्र व त्यांच्या पालकांना त्यांचे ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य राहणार असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले. दरम्यान कृषी सेवा केंद्र व कृषी निविष्ठा, कृषी प्रक्रिया उद्योग सकाळी ९ ते दुपारी ३ यावेळेत सुरू राहतील.
--किराणा दुकाने ८ ते ३ पर्यंत सुरू--
या पालिका क्षेत्रामध्ये किराणा दुकाने, स्वस्त धान्य दुकाने, फळे व भाजीपाला, दुध अैाषधे, पीठ गिरण्या सकाळी आठ ते दुपारी तीन या कालावधीत सुरू राहतील. दरम्यान दुध विक्रेते, दुध वितरण केद्र सकाळी सहा ते दुपारी तीन आणि सायंकाळी सहा ते रात्री ८:३० वाजेपर्यंत सुरू राहतील. सर्व प्रकारच्या बिगर जीवनावश्यक वस्तुंची दुकाने व आस्थापना बंद राहणार आहेत.