बुलडाणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन आहे. त्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी २३ मार्च ते १५ एप्रिल या कालावधीत जिल्हाधिकाºयांच्या आदेशाचे उल्लंघन, दारुबंदी, मोटार वाहन कायदा आदी ४७९ प्रकरणात गुन्हे दाखल केले आहेत. कोरोना विषाणूने देशासह राज्यात थैमान घातले आहे. त्यापार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी देशात लॉकडाउन घोषित केले आहे. कुणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. कोरोना खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. सध्य:स्थितीत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या २१ आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घेऊन घरातच थांबणे गरजेचे आहे. मात्र तरीही अनेकजण जिल्हाधिकाºयांच्या आदेशाचे उल्लंघन करतांना आढळून आले आहेत. शहर पोलिसांनी २३ मार्च ते १५ एप्रिलपर्यंत ४७९ प्रकरणे दाखल केली आहेत. यामध्ये संचारबंदी नियमांचे उल्लंघन करणाºया १२३ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. दारुविक्री बंद असतांनाही दारुविक्री करणाºया ३२ जणांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली. तर मोटार वाहन कायद्यान्वये ३१४ जणांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
पहिल्या दिवशी ८५ वाहनचालकांना समज
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी १५ एप्रिल रोजी कंटेनमेंट भागात दुचाकी, तीन चाकी वाहनांना बंदी केली. नियमांचे उल्लंघन केल्यास ५ हजार रुपये दंड वसूल करण्याचे आदेश दिले. मात्र तरीही अनेक वाहन चालक गुरुवारी रस्त्यावर उतरले. परंतू पहिलाच दिवस असल्याने अनेकांना याबाबत माहिती मिळाली नाही. त्यामुळे शहर पोलिसांनी ८५ जणांना समज देऊन सोडून दिले.
जिल्हाधिकाºयांच्या आदेशाचे कुणीही उल्लंघन करु नये. पहिला दिवस असल्याने ८५ वाहनचालकांना समज देऊन सोडून दिले आहे. मात्र शुक्रवारपासून मोहिम अधिक तीव्र करण्यात येणार आहे. नागरिकांनी वाहनाचा वापर, घराबाहेर पडणे टाळावे.
- प्रदीप साळुके ठाणेदार, शहर पोलिस स्टेशन बुलडाणा