- नीलेश जोशी बुलडाणा: लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात स्टार प्रचारकांनी प्रचार सुरू केला आहे. बुलडाणा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या बुलडाणा विधानसभा मतदारसंघात आघाडी तथा युतीला मताधिक्य मिळविण्याची समसमान संधी आहे; मात्र छुपी गटबाजी दोन्ही पक्षांसाठी धोकादायक ठरू शकते.विशेष म्हणजे प्रचाराच्या गेल्या दहा दिवसात या क्षेत्रात कुठलीही मोठी सभा उभय बाजूने घेतल्या गेली नाही; किंबहुना येत्या काळातही जिल्हा मुख्यालयी अशी सभा होण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणचेच मतदार एक प्रकारे अडगळीत टाकण्याची भावना व्यक्त होत आहे.मोठ्या सभा या विधानसभा क्षेत्रात नसल्या तरी आघाडी-युतीच्या उमेदवारांकडून कॉर्नर सभा आणि मतदारांशी थेट संवाद साधत प्रचार फेऱ्या काढण्यात येत आहे. वाहनावरील एलसीडीद्वारे उभय बाजूंनी प्रचार होत असल्यामुळे निवडणुकांचा माहौल तयार होत आहे. विधानसभेतील सत्ताकेंद्रे आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ झाल्याचे चित्र असताना शिवसेनेंतर्गत गटबाजी असून, विकास कामे न झाल्याने काहीसा रोष आहे.युती । प्लस पॉइंट काय आहेत?चार निवडणुकांपासून बुलडाण्यात युतीला मताधिक्य आहे. जालिंदर बुधवत, संजय गायकवाड प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. सेनेसाठी लाभदायक मोताळा तालुक्याचा विधानसभेत समावेश.युती । वीक पॉइंट काय आहेत?बुलडाणा विधानसभा काँग्रेसच्या ताब्यात आहे. पक्षांतर्गत गटबाजी आहे. विकास कामे अपेक्षेप्रमाणे न झाल्यामुळे नाराजी, आरपीआय (आठवले) गटाच्या सहकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
आघाडी । प्लस पॉइंट काय आहेत?काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एक संघपणे प्रचार करत आहे. डॉ. शिंगणे स्वत: लोकसभेच्या मैदानात उतरल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. सेनेसाठी नकारात्मक असलेल्या बाबी आघाडीच्या पथ्यावर पडणाºया आहेत.आघाडी । वीक पॉइंट काय आहेत?राष्ट्रवादीचे संघटन कौशल्य तुलनेने कमी आहे. गेल्या काही वर्षांपासून बुलडाण्यात राष्ट्रवादीचा प्रभावी नेता नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारास अनामत रक्कम गमवावी लागली होती.मागच्या निवडणुकीत़़़२०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांनी ११,६६१ मते मिळवीत तत्कालीन मनसेचे संजय गायकवाड (३५,३२४ मते) यांचा पराभव केला होता़